साईनगर शिर्डी ते नाशिक रोड या नवीन रेल्वे मार्गाचे एकत्रित भूसंपादन करावे – औताडे
अधिकचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार
कोपरगाव ( वार्ताहर) साईनगर शिर्डी ते नाशिक रोड या नवीन रेल्वे प्रकल्पाची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. 98 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे प्रकल्पामध्ये अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील राहाता कोपरगाव ,सिन्नर व नाशिक या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येणार आहे. मात्र भूसंपादनाची प्रक्रिया केवळ कोपरगाव व राहाता तालुक्यातील गावातच होत आहे. सिन्नर व नाशिक तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची भूसंपादनाची प्रक्रियाचा कुठेच उल्लेख नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील बाधित शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे
साईनगर शिर्डी ते नाशिक रोड या नवीन रेल्वे मार्गाचे एकत्रित भूसंपादन करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.

रेल्वे प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहे त्या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे रेल्वे प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत अडीअडचणी जाणून घेताना बोलत होते.
यावेळी चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव ,धोंडेवाडी, शहापूर, जवळके,बहादरपुर,बाहदराबाद अदी गावातील प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी उपस्थित होते.4 ऑगस्ट रोजी भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रामध्ये फक्त राहाता व कोपरगाव या तालुक्यातील गावांची भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या गावांची नावे आहे. या राजपत्रामध्ये सिन्नर व नाशिक तालुक्यातील गावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. केवळ कोपरगाव व राहाता तालुक्यात ही प्रक्रिया जलद गतीने सुरू असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात आहे. त्यामुळे तुर्तास अहिल्यानगर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी व एकाच वेळी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी असा या बैठकीत सांगण्यात आले.
प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी हरकती दाखल करण्याचा निर्णय घेतला असून एकाच वेळी भूसंपादनाबरोबर सन 2013 च्या कायद्यानुसार समृद्धी महामार्गा प्रमाणे संपादित केलेल्या जमिनींना विशेष बाब म्हणून पाचपट मोबदला मिळावा.
बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा. बाधित क्षेत्र निळवंडे धरणाच्या कार्यक्षेत्रात असल्याने बागायती क्षेत्र गृहीत धरून भूसंपादन करावे. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे सोनेवाडी परिसरात नव्याने एमआयडीसी सुरू झाल्याने जमिनीच्या वाढलेल्या किमतीचा विचार करून दर मिळावा. महसूल विभागाच्या पीक पाणी ॲप मध्ये दोष असल्याने तो दुरुस्त करूनच नव्याने पीक पाणी लावावी. असे विविध विषय या बैठकीत घेण्यात आले. बाधित शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे औताडे यांनी सांगितले.














