योग ही भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी – रेणुका कोल्हे
संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
कोपरगाव मनिष जाधव प्रतिनिधी – “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेला साजेसा संदेश देत कोपरगाव तालुक्यातील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार विवेक कोल्हे तसेच विश्वस्त रोणुकाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत योगाचे महत्त्व अनुभवले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सामूहिक योगासने व प्राणायामाचे सादरीकरण केले. योग प्रशिक्षक यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. योगामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधला जातो तसेच तणावमुक्त आणि निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सस्थेचे विश्वस्त रेणुका कोल्हे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचा वाढता स्क्रीनटाईम, तणाव आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता योगाची गरज अधिक महत्त्वाची ठरते. योग केवळ शरीराला लवचिक बनवत नाही, तर मनाला स्थैर्य, विचारांना सकारात्मकता आणि जीवनाला योग्य दिशा देतो. विद्यार्थ्यांनी दररोज काही मिनिटे योगासाठी दिल्यास त्यांचा आत्मविश्वास, एकाग्रता आणि कार्यक्षमता निश्चितच वाढेल. निरोगी भारताच्या निर्मितीसाठी योग प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे असल्याचे कोल्हे यांनी सागितले.

प्राचार्य मोहसीन शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग विद्यार्थ्यांना केवळ तंदुरुस्त ठेवत नाही, तर जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक ताकदही प्रदान करतो. आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाबरोबरच संयम, शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. हे सर्व गुण योगाच्या माध्यमातून सहज विकसित होतात. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्त्व आणि सुदृढ जीवनमूल्ये रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्राचार्य मोहसीन शेख यांनी सागितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याची शपथ घेतली. योग दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसरात आरोग्य, सकारात्मकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.














