सक्षम शहर स्पर्धेत येवला नगरपरिषदेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; दिवाळीनिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप
येवला : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘सक्षम शहर स्पर्धेत’ येवला नगरपरिषदेने नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या येवला नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष श्री. राजेंद्रभाऊ लोणारी यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.


येवला नगरपरिषदेने सक्षम शहर स्पर्धेत मिळवलेले यश हे नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि विशेषतः स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सामूहिक मेहनतीचे फलित आहे. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दिवाळीच्या आनंदात त्यांचाही सहभाग असावा, या भावनेतून शिधावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रभाऊ लोणारी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करून, येवला शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. तसेच शहराने सक्षम शहर स्पर्धेत मिळवलेला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक कायम राखण्यासाठी सर्वांनी यापुढेही एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी येवला नगरपरिषदेला सक्षम शहर स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल मुख्याधिकारी श्री. तुषार संजय आहेर यांचा नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच उपस्थित सन्माननीय नगरसेवक व नगरसेविकांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने केलेल्या नियोजनबद्ध कामगिरीचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सौ. पुष्पाताई गायकवाड, गटनेते दीपक लोणारी, शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे, भुजबळ साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री. बाळासाहेब लोखंडे, नगरसेवक कुणाल परदेशी, गोटूभाऊ मांजरे, अमजद शेख, प्रवीण बनकर अमोल शिंदे, सुनील अण्णा जाधव, जावेद भाई लखपती अक्षय राजपूत नगरसेविका छायाताई क्षीरसागर, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पारुल गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.
सक्षम शहर स्पर्धेतील यशाचा आनंद साजरा करताना शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत वाटून घेण्याचा येवला नगरपरिषदेचा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष कौतुकाचा ठरला. ‘स्वच्छ येवला, सुंदर येवला’ या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम ठरला.














