‘स्वच्छ कोपरगाव, सुंदर कोपरगाव’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नगरपरिषदेचे महत्त्वपूर्ण पाऊल – मा. आ. स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव नगर परिषदेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्वीपर मशीनचा शुभारंभ, महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव शहर धुळमुक्त आणि स्वच्छ करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने अत्याधुनिक डस्ट कलेक्टर मशीन खरेदी करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या आधुनिक मशीनमुळे रस्त्यांवरील धूळ आणि कचरा संकलित करून शहराची स्वच्छता अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. ‘स्वच्छ कोपरगाव, सुंदर कोपरगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने नगर परिषदेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.

कोपरगाव शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या अत्याधुनिक स्वीपर मशीनचा शुभारंभ गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते श्री साईबाबा कॉर्नर येथे करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि शहरवासीयांच्या उपस्थितीत मशीनचे श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची स्वच्छता पारंपरिक पद्धतीने झाडू मारून केली जात होती. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. ही बाब लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्वीपर मशीनद्वारे शहरातील रस्त्यांवरील धूळ आणि कचरा संकलित केला जाणार असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यांची नियमित स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती मिळणार असून, धुळमुक्त कोपरगावच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.यावेळी कोपरगाव शहरात स्वच्छतेचे कर्तव्य बजावणाऱ्या महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मा. आ. स्नेहलताताई कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मा. आ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, दिवाळीपूर्वी आपण ज्या पद्धतीने घराची स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे आपले शहरही स्वच्छ असणे गरजेचे आहे. शहरातील धूळ संकलित करून स्वच्छता राखणे हा या मशीन खरेदीमागील मुख्य उद्देश आहे. नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून विकासकामांचा लाभ मिळवून देण्यासाठी नगर परिषद प्रशासन सातत्याने कार्यरत आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे आणि आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर धुळमुक्त करण्याचा संकल्प पूर्णत्वास जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. शहरवासीयांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
याप्रसंगी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी श्री साई तपोभूमी येथे मनोभावे दर्शन घेतले. तसेच वसुबारसच्या निमित्ताने गोमातेस चारा अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत, आरोग्य सभापती वैभव आढाव, सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव शहर धुळमुक्त करण्याचा आमचा मानस या उपक्रमातून पूर्णत्वास जात आहे. शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत दोन्ही आमदारांनी टोकाचे राजकारण न करता शहराच्या हितासाठी एकत्रितपणे काम करावे. विकासासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी.- मा. आ. स्नेहलताताई कोल्हे














