जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ.आशुतोष काळेंचा दणदणीत विजय
कोळपेवाडी वार्ताहर :- आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आर्थिक कामधेनु म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेती पूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे अधिकुत उमेदवार कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतीपूरक मतदार संघातून सहकार विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले आमदार आशुतोष काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होवूनही अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड होता होता राहिल्यामुळे आमदार आशुतोष काळे निवडणुकीला सामोरे गेले.

निवडणुकीतील विजय जरी त्यांच्या दृष्टीपथात असला तरीपण त्यांनी गाफील न राहता सहकार विकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सहकार्याबरोबरच स्वत:ची यंत्रणा उभी करून प्रत्येक मतदारांपर्यंत ते पोहोचले होते.त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी दणदणीत विजय मिळवत २०१७ ला पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपासून ते २०१९ असेल किंवा २०२४ ची विधानसभा निवडणूक असेल त्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळवत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही आपली यशाची परंपरा आमदार आशुतोष काळे यांनी कायम ठेवली आहे.
राज्यातील सर्वात मोठी असलेली अहमदनगर जिल्हा बँक हि शेतकऱ्यांची बँक आहे.भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. त्यामुळे पुढील दुष्काळी परिस्थितीवर नक्कीच अजून काही प्रभावी उपाययोजना निश्चितपणे करता आल्या असत्या. परंतु आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे इतर ११ जागा बिनविरोध झाल्या मात्र १० जागांवर एकमत न झाल्यामुळे शेती पूरक मतदार संघाच्या जागेवर शेवटच्या क्षणी निवडणूक लादली गेली. शेतीपूरक मतदार संघात निवडणूक झाल्यास निकाल काय लागणार हे जरी मला माहित होते तरी लोकशाहीचा आदर ठेवून निवडणुकीला सामोरे गेलो.आणि सुज्ञ मतदारांनी त्याचे काम चोख बजावत दणदणीत विजय मिळवून दिला.त्याबद्दल सर्व मतदारांचे तसेच सहकार विकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे व माझ्या विजयात प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार. -आ.आशुतोष काळे













