स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश — हेमंत पटवर्धन
कोपरगाव मनिष जाधव – संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेले पवित्र परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर जिथे शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पाहवा लागत नाही असे जगप्रसिद्ध असलेल्या एकमेव श्री क्षेत्र बेट देवस्थान येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान अंतर्गत महिला सेनेमार्फत आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत आज कोपरगाव तालुका, अहिल्यानगर येथे शुक्राचार्य महाराज मंदिर स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात सपन्न झाले.

श्री क्षेत्र बेट हे श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृतीचे पवित्र केंद्र आहे. या पावन भूमीची स्वच्छता करणे म्हणजे प्रत्यक्षात शुक्राचार्य महाराजांची सेवा करण्यासारखेच आहे. सेवाभावाने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानातून समाजाला स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेरणादायी संदेश मिळाला आहे. अशा उपक्रमांमुळे देवस्थानाचे पावित्र्य जपण्यासोबतच समाजात सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत शुक्राचार्य मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हेमंत पटवर्धन यानी व्यक्त केले.

सदर स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला कोल्हे, तालुका अध्यक्ष महेंद्र सिनगर, तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख संदीप दीक्षित, तालुका आध्यात्मिक प्रमुख रमेश नेवसे तसेच तालुका ॲम्ब्युलन्स प्रमुख योगेश आगवण, गुरु सेविका सोनाली जाधव तसेच या अभियानात तालुक्यातील विविध सेवा केंद्रांचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा, संग्राम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सर्व सेवेकऱ्यांनी एकत्रितपणे मंदिर परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमातून स्वच्छता, सेवा आणि समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी यांचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या स्वच्छता अभियानाला सर्व सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून उपस्थितांनी भविष्यातही अशाच सामाजिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.














