संगमनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा; १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपचा साठा जप्त
अहिल्यानगर दि 26(जिमाका): सण-उत्सवांच्या (फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६) पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शुद्ध आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त श्री. माने आणि अन्न विभागाचे सहायक आयुक्त एस. एच. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा पथकाने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमनेर येथील एका अन्न प्रक्रिया उद्योगावर धडक कारवाई केली. या छाप्यात सुमारे १५,००,५६६/- (पंधरा लाख पाचशे सहासष्ट) रुपये किमतीचा संशयास्पद आणि मिसब्रँडेड अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

*कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे*
• प्रतिष्ठानचे नाव व पत्ता: मेसर्स जगदंबा फूड प्रॉडक्ट्स, तालुका- संगमनेर, जिल्हा- अहिल्यानगर.
• जप्त केलेला मुद्देमाल व किंमत:
१) धने डाळ (Split Dhana Seeds): एकूण ५,९९८ किलोग्रॅम साठा (किंमत रु. ८,९९,७००/-). सदर साठा ‘डी. ए. पटेल, उंझा, गुजरात’ या पुरवठादाराकडून मागवण्यात आला होता.
२) बडीशेप (Fennel Seeds/Saunf): एकूण ३,५९८ किलोग्रॅम साठा (किंमत रु. ६,००,८६६/-). हा साठा देखील ‘डी. ए. पटेल, उंझा, गुजरात’ यांच्याकडून आलेला होता.
• एकूण जप्त साठा व किंमत: एकूण ९,५९६ किलो ग्रॅम, एकूण किंमत रु. १५,००,५६६/-
*कारवाईचे कारण:*
सदर अन्नपदार्थांचा साठा हा ‘मिसब्रँडेड’ (चुकीची लेबलिंग असलेला) आणि कमी दर्जाचा (Substandard) किंवा आरोग्याला अपायकारक (Unsafe) असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या साठ्याचे नमुने (Samples) विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल.
कारवाई करणारे पथक:
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) यु. आर. सूर्यवंशी आणि सहायक आयुक्त (अन्न) परिमंडळ-२ अहिल्यानगर, श्री. एस. एच. इंगळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि नियमबाह्य विक्री रोखण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम अशीच तीव्र गतीने सुरू राहणार असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.













