पशुधनाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस कॅल्शियम विक्रेत्याला कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचा दणका!
करंजीत रस्त्यावर व पशुधन गोठ्यावर जाऊन बनावट,विनापत्ता, विनानावाच्या बाटल्यांची विक्री
पशुधनाच्या जीवाशी खेळ; शेतकऱ्यांनी सावध राहावे!
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातील करंजी परिसरात पशुधनासाठी कथित बनावट कॅल्शियमच्या बाटल्यांची उत्तरप्रदेश येथील (शादाब) या व्यक्ती ने दोनशे साठ रुपयाला खरेदी केली व शेतकऱ्यांना तब्बल दोनशे रुपया विक्री करत असल्याचे निदर्शनास आले तसेच पशुधन गोठ्यावर जाऊन बनावट असलेले कॅल्शियम विक्री होत असल्याचे करंजी येथील ओम साई मेडिकल चे सचालक नितीन खौरनार यानी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या निदर्शनास आणुन दिले तातडीने कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनने तातडीने घटनास्थळी धाव घेत विक्रेत्याला जाब विचारत संबंधित माल ताब्यात घेतला. बाटल्यांवर कंपनीचे नाव, पत्ता अथवा उत्पादनासंबंधी आवश्यक माहिती नसल्याने या विक्री प्रकाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी,उपाध्यक्ष भरत मोरे व अन्य सदस्यांनी करंजी येथे भेट देत या प्रकाराची पाहणी केली. रस्त्यावर बसून आणि थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन स्वस्त दरात पशुधनासाठी बनावट कॅल्शियम विकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर असोसिएशनच्या सदस्यांनी संबंधित विक्रेत्याला रोखून विचारपूस केली. विक्रेत्याने हा माल चाळीसगाव येथून आणल्याचे सांगितल्याची माहिती असोसिएशनच्या सदस्यांनी दिली.
संबंधित बाटल्यांवर उत्पादक कंपनीचे नाव, पत्ता व अन्य तपशील आढळत नसल्याने हा माल नेमका कुठे तयार झाला, त्याची गुणवत्ता काय, त्यात कोणते घटक आहेत आणि पशुधनाला तो देणे सुरक्षित आहे का, असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. असोसिएशनच्या सदस्यांनी संबंधित माल ताब्यात घेत विक्रेत्याच्या हातून तो नष्ट केला.
पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित औषधे अथवा पूरक उत्पादने कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. कमी किमतीच्या आमिषाला बळी पडून अशा संशयास्पद उत्पादनांची खरेदी केल्यास जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशी जोडलेला असल्याने अशा विक्री प्रकारांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे भरत मोरे यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले की, रस्त्यावर अथवा घरोघरी येऊन अनोळखी व्यक्तींकडून औषधे व पशुधनासाठी पूरक उत्पादने खरेदी करू नयेत. उत्पादनाची अधिकृत माहिती, उत्पादक, गुणवत्ता व वैधता तपासून अधिकृत विक्री केंद्रातूनच औषधे खरेदी करावीत.
तुकाराम मुडे साहेबांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज!
राज्यात सध्या बोगसगिरी, अनधिकृत विक्री व फसवणुकीच्या प्रकारांविरोधात तुकाराम मुडे साहेबांकडून कठोर भूमिका घेतली जात असताना, कोपरगाव तालुक्यात पशुधनासाठी संशयास्पद कॅल्शियमची विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर येणे ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर केवळ स्थानिक पातळीवर कारवाई न होता संबंधित विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तुकाराम मुडे साहेबांनीही या प्रकाराकडे लक्ष घालून अशा बोगस व अनधिकृत विक्री करणाऱ्यांविरोधात राज्यभर कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा शेतकरी व केमिस्ट असोसिएशनकडून व्यक्त होत आहे. पशुधनासाठी विक्री होणाऱ्या औषधांची गुणवत्ता, उत्पादकाची माहिती आणि विक्रीची अधिकृतता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
पशुधनाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारांना आळा बसावा आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी असोसिएशनने घेतलेल्या भूमिकेमुळे परिसरात या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, संबंधित उत्पादनांची अधिकृत तपासणी व प्रशासनाकडून पडताळणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बोगसगिरीविरोधात कारवाईची गरज
राज्यात सध्या बोगसगिरी व अनधिकृत व्यवसायांविरोधात कारवाईचा जोर वाढत असताना पशुधनासाठी संशयास्पद औषधांची विक्री सुरू असल्याचा प्रकार चिंताजनक आहे. अशा विक्रेत्यांवर संबंधित औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग व स्थानिक प्रशासनाने योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी व उपाध्यक्ष भरत मोरे यांनी केली.













