संजीवनीचे विद्यार्थी राज्यस्तरावरही चमकतील – मोहसीन शेख
तलवारबाजीच्या मैदानावर संजीवनीचा दबदबा;
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव : नुकतेच जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कोपरगाव येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदकांवर आपले नाव कोरले. सदर स्पर्धेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे, जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

१७ वर्षे मुलांच्या गटात सोहम मच्छिंद्र लांबोळे याने प्रथम क्रमांक, तर पार्थ चंद्रकांत भिंगारे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षे मुलींच्या गटात अवनी विशाल परजणे हिने द्वितीय, तर वेदश्री दरेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच १४ वर्षे मुलांच्या गटात ईशान कैलास वर्पे याने प्रथम, साईदुर्ग शिवराज पाळणे याने द्वितीय, तर सलमान मुक्तार पठाण याने तृतीय क्रमांक मिळवत संजीवनीच्या यशात भर घातली. यश दिवेकर (EPE) यानेही उल्लेखनीय कामगिरी केली.

एकाच जिल्हास्तरीय स्पर्धेत संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी अनेक पदके मिळवत तलवारबाजीच्या मैदानावर आपला दबदबा निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीला आणखी बळ मिळाले असून, शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना संधी देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांच्या गुणवत्तेला दिशा मिळावी आणि प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त क्षमता विकसित व्हावी, यासाठी व्यवस्थापकीय विश्वस्त व मार्गदर्शक सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना तलवारबाजीसाठी आवश्यक Fencing Kits व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, तसेच विद्यार्थ्यांना सातत्याने दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ यामुळे क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक राहुल रुईकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी आवश्यक तंत्र, वेग, चपळता आणि मानसिक तयारीवर मेहनत घेतली. तसेच शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडा गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
प्राचार्य मोहसीन शेख यावेळी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे हे यश केवळ पदक मिळविण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला मिळालेली ही पावती आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पुढे जावे, यासाठी शाळेच्या वतीने त्यांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. तलवारबाजीसारख्या क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद असून, आगामी काळात संजीवनीचे विद्यार्थी विभागीय व राज्यस्तरावरही चमकतील, असा विश्वास असल्याचे प्राचार्य मोहसीन शेख यानी सागितले.
या यशाबद्दल संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे, मार्गदर्शक शिक्षक राहुल रुईकर तसेच प्राचार्य मोहसीन शेख यांचे अभिनंदन होत आहे. संजीवनीची ही विजयी परंपरा अशीच कायम राहावी आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आणखी मोठी भरारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













