जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा व निवड चाचणी ६ सप्टेंबरला कोपरगावात
कोपरगाव मनिष जाधव : अहमदनगर तलवारबाजी फेन्सिंग असोसिएशन, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी जिल्हास्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा तसेच निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा व निवड चाचणी ६ सप्टेंबर २०२६ रोजी एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे.

या स्पर्धेतून १९ वर्षे वयोगटातील गुणवंत खेळाडूंची जिल्हास्तरीय संघासाठी निवड करण्यात येणार असून निवड झालेला जिल्ह्याचा संघ ३४व्या ज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी अमरावती येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलवारबाजी खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
क्रीडा शिक्षक, क्रीडा कोच, प्रशिक्षक तसेच शाळा व महाविद्यालयांच्या संबंधित प्रतिनिधींनी आपल्या संस्थेतील पात्र खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तलवारबाजी हा खेळ ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या कक्षेत येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच विविध संधींच्या दृष्टीने या खेळाचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांनी आपले संघ सहभागी करून विद्यार्थ्यांना तलवारबाजी खेळाची ओळख करून द्यावी आणि भविष्यातील शालेय तलवारबाजी स्पर्धांमध्ये सहभागासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तलवारबाजी या क्रीडा प्रकारामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता, चपळता, एकाग्रता, तत्पर निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते. जिल्हास्तरावरील स्पर्धेतून खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची तसेच पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व तलवारबाजी खेळाडूंनी या स्पर्धेची नोंद घेऊन जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तलवारबाजी खेळाचा जिल्ह्यात अधिक व्यापक प्रसार व्हावा आणि या क्रीडा प्रकारातून गुणवंत खेळाडू पुढे यावेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
संदेश भागवत सर – ९४२२२ २९२८१
राहुल रुईकर सर – ८३०८० ७१६७८
आर्यन घोडके सर – ८७२००९६३९८














