गोदावरी कालव्यांचे अस्तरीकरण खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू!
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांचा पाटबंधारे विभागाला इशारा; अस्तरीकरणाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार
कोपरगाव (वार्ताहर) : गोदावरी उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचा घाट घालून पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळू नये. कालव्यांचे अस्तरीकरण झाल्यास परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे गोदावरी उजव्या कालव्यांचे अस्तरीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. पाटबंधारे विभागाने काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात गोदावरी उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला तीव्र विरोध होत असताना आता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी-हांडेवाडी परिसरात पाटबंधारे विभागाने अस्तरीकरणाचे काम सुरू केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, स्थानिक शेतकऱ्यांनीही या कामाला विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेला औताडे यांनी ठाम पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन पाठवून अस्तरीकरणाचे काम थांबविण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात गोदावरी व प्रवरा कालव्यांची निर्मिती करण्यात आली. या कालव्यांमधून ओढे-नाल्यांमध्ये अतिरिक्त पाणी सोडण्याची व्यवस्था होती. त्यामुळे पाण्याचा जमिनीत पाझर होऊन परिसरातील विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होत होती. मात्र, २००५ मधील समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्यानंतर ओढे-नाल्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी असलेले एस्केप बंद करण्यात आल्याने कालवा क्षेत्रातील भूजलपातळीवर विपरीत परिणाम झाल्याचे औताडे यांनी नमूद केले.
कालव्यांना आवर्तनाद्वारे पाणी सोडले जाते, तेव्हा होणाऱ्या पाझरामुळे कालव्यालगतच्या विहिरींमध्ये पाणी टिकून राहण्यास मदत होते. मात्र, अस्तरीकरणामुळे पाण्याचा जमिनीत होणारा पाझर कमी झाल्यास विहिरींची पाणीपातळी आणखी खालावण्याची भीती आहे. परिणामी, शेतीसाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होईल, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल आणि ग्रामस्थांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती सोडून स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते, अशी गंभीर चिंता औताडे यांनी व्यक्त केली.
पाटबंधारे विभागाने केवळ कालव्यातील पाणीगळती रोखण्याचा विचार न करता या भागाची भौगोलिक परिस्थिती, भूजलपातळी, विहिरींची स्थिती आणि अस्तरीकरणाचे दीर्घकालीन परिणाम यांचा सखोल अभ्यास करावा. कालव्यांची निर्मिती होण्यापूर्वीची आणि त्यानंतरची परिस्थिती तपासून शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्था, पशुधन आणि गावांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अस्तरीकरणाचे काम पुढे रेटणे अन्यायकारक ठरेल. पाटबंधारे विभागाने तातडीने या कामाबाबत पुनर्विचार करावा; अन्यथा गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकत्र करून रस्त्यावर उतरावे लागेल. शेतकऱ्यांचे पाणी आणि त्यांच्या भवितव्याशी तडजोड केली जाणार नाही, असा ठाम निर्धार नितीनराव औताडे यांनी व्यक्त केला.












