के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’ या विषयावर विशेष व्याख्यान सत्राचे आयोजन
कोपरगाव : के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांचे कायदेशीर हक्क आणि सुरक्षितता’ या विषयावर विशेष व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. विजय ठाणगे होते.

याप्रसंगी प्रमुख वक्त्या ॲड. राजश्री शिंदे यांनी महिलांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क, कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH), सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिला हेल्पलाइन तसेच अन्याय झाल्यास उपलब्ध कायदेशीर उपाययोजना याविषयी विद्यार्थी व विद्यार्थिनींना विस्तृत मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्याचे आवाहन देखील ऍड शिंदे यांनी केले.
या व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर साक्षरता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. सायली भावसार यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले, तर प्रा. वर्षा आहेर यांनी प्रमुख वक्त्या, मा. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ . नीता शिंदे, प्रा. सौ खंडीझोड प्रा. वहाडणे, प्रा सौ वाकचौरे प्रा . हर्षदा गवळी ,प्रा. कर्डिले ,प्रा.घुगे मॅडम यांचे सहकार्य लाभले.














