आपला जिल्हा

लोकसहभातून वाचनकट्टा उपक्रम शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ बनेल – वैशाली डिगे

मनिष जाधव 9823752964

लोकसहभातून वाचनकट्टा उपक्रम शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ बनेल – वैशाली डिगे

कोपरगांव मनिष जाधव –  जिल्हा परिषद शाळांमधील वाचनक‌ट्टा हा उपक्रम केवळ शालेय उपक्रम न राहता त्याला लोकसहभागाची जोड दिल्यास तो ग्रामीण शैक्षणिक परिवर्तनाची चळवळ बनू शकतो असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उपसचिव श्रीमती वैशाली डिगे यांनी केले.

आ

संवत्सर जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरु करण्यात आलेल्या कुसुमाग्रज वाचनालय क‌ट्टा उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात श्रीमती वैशाली डिगे बोलत होत्या. पुणे शिक्षण विभागाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी उपसरपंच विवेक परजणे, राहाता पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, कोपरगांव पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र दिघे, शाखा अभियंता आश्विन वाघ, विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे, मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी स्वागत केले तर शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी प्रास्ताविक केले.

ळ

विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी क्षितिजे प्राप्त करुन देणारा, कल्पनाशक्तीला भरारी देणारा आणि व्यक्तिमत्व विकासाला समृध्द करणारा वाचनक‌ट्टा हा संवत्सर जिल्हा परिषद शाळेने सुरु केलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौध्दीक जडणघडणीस निश्चित नवी दिशा देणारा ठरेल असे सांगून श्रीमती डिगे पुढे म्हणाल्या, आजच्या संक्रमणशील व डिजिटल युगात मोबाईल, दूरचित्रवाणी आणि विविध मनोरंजनाच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आवड कमी होत असल्याचे दिसून येते. ही परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे त्यांची भाषिक क्षमता विकसित करणे, शब्दसंपत्तीत भर घालणे व स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वृध्दींगत करणे या व्यापक उद्देशाने वाचनक‌ट्टा उपक्रमांसारखे व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजेत. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सर्वच शाळांमधून ही संकल्पना राबविली तर, उद्याच्या सुजाण, सुसंस्कृत व विचारशील पिढीची निर्मिती करणारा हा महत्वपूर्ण उपक्रम ठरु शकतो.

पुणे शिक्षण विभागाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी संवत्सर शाळेत आजवर राबविल्या गेलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांची गुणवत्ता व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राजेश परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली संवत्सर शाळेने जे जे उपक्रम राबविले आहेत, ते इतर शाळांसाठी अनुकरणीय आहेत. जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर शाळेला प्राप्त झालेल्या शैक्षणिक पुरस्कारातून शाळेची प्रागतिक महती अधोरेखित होते. वाचनक‌ट्टा उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांना मोबाईलसारख्या आभासी जंजाळातून पुस्तकांच्या ज्ञानसमृध्द विश्वाकडे वळविण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम शाळेने केलेले आहे. हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न रहाता त्याला ग्रामस्थांचा सहभाग लाभला तर, यातून उद्याची सुजाण, विचारशील व सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास चांगली मदत होऊ शकते असे सांगून श्री काठमोरे यांनी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

श्री राजेश परजणे यांनी प्रास्ताविकातून शाळेत आजवर राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. वाचनक‌ट्टा उपक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले, शाळेतील अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय तसेच आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित करणे, आजच्या डिजिटल आणि मोबाईल माध्यमांच्या विळख्यातून त्यांना दूर करुन पुस्तकांशी असलेला संवाद अधिक दृढ करणे, वाचनाविषयी त्यांच्या मनात जिज्ञासा, जाणिवा, संवेदनशीलता निर्माण करणे या उद्देशाने वाचनक‌ट्टा उपक्रम शाळेत सुरु करण्यात आलेला असून विद्यार्थी केवळ परीक्षेतून यशस्वी होण्याऐवजी जीवनाच्या परीक्षेतही ते यशस्वी व्हावेत हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश असल्याचेही श्री परजणे यांनी सांगितले.

यावेळी शाळेच्या प्रांगणात सिंधुछाया गृह राशी उद्यानाचे उ‌द्घाटन, अन्नपुर्णा बाल पोषण स्वयंपाकगृहाचे भूमीपूजन, वृक्षारोपण आदी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. दुष्काळजन्य परिस्थिती विचारात घेऊन वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा व गरजू विद्यार्थी व शेतकरी बांधवांना वस्तुच्या रुपात मदत करण्याच्या राजेश परजणे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत शाखा अभियंता राजेंद्र दिघे यांनी वाचनक‌ट्टा उपक्रमासाठी ३१ हजार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा वरगुडे यांनी दप्तरांसाठी १० हजार, माजी गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी ५ हजार, पंचायत समितीचे लेखाधिकारी संजय कोल्हे यांनी ५ हजार, सुनील सरोदे यांनी १ हजार रुपयांची देणगी रोख स्वरुपात दिली. कार्यक्रमास लक्ष्मणराव साबळे, खंडू फेफाळे, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, संजय भाकरे, सोमनाथ निरगुडे, दिलीपराव ढेपले, राजेंद्र ढेपले, राजेंद्र निकम, पंढरीनाथ आबक, आण्णासाहेब तिरमखे, चंद्रकांत साबळे, लक्ष्मण बोरनारे, विजय परजणे, मधुकर शेटे, दत्तात्रय शेटे, बापू तिरमखे, अनिल आचारी, कृष्णा आबक, बाळासाहेब दहे, विजय कर्पे, सोमनाथ घेर, कारभारी भाकरे, बापूसाहेब गायकवाड, अविनाश गायकवाड, संदीप भाकरे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे यांनी आभार व्यक्त केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!