कोपरगाव शहरातील सर्व बोअरवेल तातडीने दुरुस्त करा – सचिन परदेशी
कोपरगाव प्रतिनिधी – दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन कोपरगाव शहरात सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा नगरपरिषदेचा निर्णय पाण्याची बचत व पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेता योग्य आहे. मात्र, सध्या नवरात्र सुरू असून पुढे दिवाळीसारखा मोठा सण येत आहे. या काळात स्वच्छता व दैनंदिन वापरासाठी पाण्याची अधिक गरज भासणार आहे. त्यामुळे कोपरगाव शहर, बेट भाग तसेच उपनगरांमधील सर्व शासकीय बोअरवेलची तातडीने पाहणी करून बंद व नादुरुस्त बोअरवेल दुरुस्त करून सुरू कराव्यात. यामुळे नागरिकांना वापराच्या पाण्यासाठी दिलासा मिळेल आणि पिण्याच्या पाण्यावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.

यासंदर्भात यापूर्वीही मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. तरी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व शासकीय बोअरवेलची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन परदेशी यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहेत.












