वेळेअभावी अनेक नागरिक प्रदर्शनापासून वंचित; शिर्डीतील संरक्षण प्रदर्शनात नाराजीचा सूर
शिर्डी, दि. २४ (प्रतिनिधी) :
शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त २३ व २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य संरक्षण साहित्य प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र शेवटच्या दिवशी नियोजित वेळेपूर्वीच प्रवेश बंद करण्यात आल्याने अनेक नागरिकांना प्रदर्शन पाहता न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिग यांच्या हस्ते निबे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्याची देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

या प्रकल्पात १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन होणार असून, दरवर्षी सुमारे पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्यात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण उत्पादन प्रक्रिया व कच्चा माल स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. अवघ्या एका वर्षात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला मोठे बळ मिळणार आहे.
उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संरक्षण प्रदर्शनात रॉकेट, क्षेपणास्त्रे, ड्रोन तंत्रज्ञान, रॉकेट लाँचरचे सुटे भाग तसेच विविध आधुनिक संरक्षण यंत्रणांचे मॉडेल्स नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देत संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. देशातील नामांकित संरक्षण कंपन्या तसेच शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.
मात्र प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी आयोजकांनी जाहीर केलेल्या वेळेनुसार अनेक नागरिक, पालक, शेतकरी व युवक प्रकल्पस्थळी पोहोचले असता प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेकांना रॉकेट व क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन पाहता आले नाही. “वेळ वाढवायला हवी होती” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त करत नाराजी दर्शविली.
अहिल्यानगर जिल्ह्याला आधीपासूनच रणगाडा प्रशिक्षण केंद्र, के. के. रेंजेस आणि मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. नव्याने सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या संरक्षण क्षेत्रातील ओळखीला आणखी बळ मिळणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.














