येवला नगरपरिषदेची नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई
येवला प्रतिनिधी – येवला नगर परिषदेकडून शहरात नायलॉन मांजा विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. कुंभार गल्ली, पिंजर गल्ली तसेच नांदगाव रोड या परिसरात तपासणी करत मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेला नायलॉन मांजा आसाऱ्यासह जागेवरच नष्ट करण्यात आला.

ही कारवाई येवला नगरपरिषदेचे माननीय मुख्यधिकारी श्री. तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत दिपक जावळे संदीप बोढरे, लखन बाकळे, साहिल गोसावी, प्रभाकर वाघ, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी श्री. तुषार आहेर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नायलॉन मांजाचा वापर केल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच पशुपक्षी, प्राणी आणि माणसांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये. सण-उत्सव पारंपारिक व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत, जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि कोणालाही हानी पोहोचणार नाही.
नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे की, भविष्यातही नायलॉन मांजा विरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे व सुरक्षित, पर्यावरणस्नेही सण साजरे करावेत, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.














