के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या डॉ. स्वाती रहाणे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘सारथी सन्मान’ प्रदान …
कोपरगाव मनिष जाधव – के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी डॉ. स्वाती नामदेव रहाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’ या संशोधन संस्थेच्या वतीने ‘सारथी सन्मान’ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे एका दिमाखदार शासकीय समारंभात प्रदान करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. ठाणगे म्हणाले की “डॉ. स्वाती रहाणे यांनी अकरावी पासून बी. एस्सी. पदवी पर्यंत सोमैया महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. त्यांचे घवघवीत यश आणि प्रज्ञा हेरून महाविद्यालयाने त्यांना पदव्युत्तर पदवी व पुढील संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. रहाणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून एम. एस्सी. व डॉ. संदेश जाडकर यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. ही उच्च पदवी प्राप्त केली. सध्या स्वाती रहाणे ह्या ‘आयआयएससी बेंगलुरु’ येथे ‘पोस्ट डॉक्टरल रिसर्च’ करीत असून त्यांना ‘महिला वैज्ञानिक फेलोशिप’, ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन फेलोशिप’ व ‘यंग वुमन रिसर्च ऑफ इयर 2024’ असे अनेक नामांकित पुरस्कार देखील मिळाले आहेत. डॉ. स्वाती रहाणे यांच्या या कर्तृत्वाने संस्था व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
डॉ. रहाणे यांना भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भोसले व डॉ. निलेश पोटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. रहाणे यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव एड्. संजीव कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्यावर सोमैया महाविद्यालय परिवार तसेच कोपरगाव तालुका परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.














