अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली
महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल – मा.आ.अशोकराव काळे
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जयंतीनिमित्त अभिवादन
कोळपेवाडी वार्ताहर :- स्व.अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. विकासकामांना दिलेले प्राधान्य, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशासनावरील त्यांची भक्कम पकड यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून स्व. अजितदादांचे नेतृत्व, विकासाची दूरदृष्टी आणि निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल अशा शब्दात माजी आमदार अशोकराव काळे यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा माजी अर्थमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण केली.

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते स्व.अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी बोलतांना मा.आ.अशोकराव काळे म्हणाले, बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले. आज त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करताना मन सुन्न होते. सामाजिक आणि राजकीय जीवनात तावून-सुलाखून निघालेले अजितदादांसारखे नेतृत्व घडण्यासाठी अनेक दशके लागतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध जपणारे दादा अचानक आपल्यातून निघून जातील, अशी कल्पनाही कधी केली नव्हती.
ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षातील आमदारांनाही विकासकामांसाठी उदारपणे निधी देणारे अर्थमंत्री म्हणून अजितदादा मी जवळून अनुभवले आहेत. माझ्या दोन पंचवार्षिक कार्यकाळात मी विरोधी पक्षाचा आमदार असतांनाही त्यांनी मतदार संघातील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनेक ऐतिहासिक विकासकामे मार्गी लागली.अजितदादांच्या कार्यशैलीचा उल्लेख करतांना स्पष्टवक्ते, वक्तशीरपणा, प्रशासनावरील भक्कम पकड आणि विकासाभिमुख निर्णयक्षमता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण असल्याचे त्यांनी सांगितले. स्व.अजितदादांनी ज्या-ज्या पदांवर काम केले, त्या प्रत्येक पदाला न्याय दिला. राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, यावरून त्यांच्या नेतृत्वाची उंची दिसून येते.आज अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांनी महाराष्ट्राला दिलेली विकासाची दिशा, सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास आणि विकासकेंद्री राजकारणाचा वारसा कायम प्रेरणादायी राहील अशा शब्दांत मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी कारखाना परिसरात संचालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, सूर्यभान कोळपे, दिलीपराव बोरनारे, श्रीराम राजेभोसले, सचिन चांदगुडे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, मनोज जगझाप, प्रशांत घुले, डॉ.मच्छिंद्र बर्डे, अशोकराव मवाळ, विष्णू शिंदे, श्रावण आसने, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, डेप्यु.सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.














