सर्जा-राजाच्या साजशृंगारासाठी येवला बाजारात लगबग
पंकज भुजबळांचा शेतकऱ्यांशी आपुलकीचा संवाद
येवला प्रतिनिधी मनिष जाधव :– बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील आठवडी बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या साजशृंगारासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी बाजारात मोठी गर्दी केली होती. यावेळी मा.आ. श्री. पंकज भुजबळ, विधान परिषद सदस्य यांच्यासह सचिन कळमकर, भुजबळ साहेबांचे जनसंपर्क अधिकारी, बाळासाहेब लोखंडे, नगराध्यक्ष राजाभाऊ लोणारे, शहराध्यक्ष दत्ता निकम, सचिन सोनवणे, दिपक लोणारी आदि मोठ्या याच्यासह अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांनी बाजारात फेरफटका मारून विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली.

बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी सजवून त्यांची पूजा केली जाते. याच पारंपरिक उत्साहाची झलक येवला येथील आठवडी बाजारात पाहायला मिळाली.

बाजारपेठेत पोळ्यासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी शेतकरी बांधवांची लगबग सुरू होती. बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, साज, दोर, विविध अलंकार आणि पूजेसाठी आवश्यक वस्तू खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. बाजारातील या चैतन्यमय वातावरणाचा अनुभव घेत मा.आ. पंकज भुजबळ यांनी शेतकरी बांधवांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या शेतीविषयक बाबी, बाजारातील परिस्थिती तसेच पोळा सणाच्या तयारीबाबतही चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यात आला. बाजारातील व्यापारी आणि नागरिकांनीही यावेळी संवाद साधत आपलेपणाची भावना व्यक्त केली.
दरम्यान, सर्जा-राजाच्या साजशृंगारासाठी आवश्यक वस्तूंची स्वतः खरेदी करत बैलपोळ्याच्या परंपरेशी असलेले नाते जपण्यात आले. शेतकरी बांधवांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या शेतीव्यवस्थेत बैलांचे योगदान मोठे असून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

बाजारातील व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत सर्वांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सणाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या कष्टांशी आणि मातीतल्या परंपरांशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा आनंद मिळाला. येवला आठवडी बाजारातील उत्साह, शेतकऱ्यांची लगबग आणि सर्जा-राजाच्या स्वागताची तयारी यामुळे पोळ्यापूर्वीच बाजारपेठेत ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले.














