स्वच्छ कोपरगाव, सुंदर कोपरगाव अभियानाला प्रभाग क्रमांक ६ पासून उत्स्फूर्त सुरुवात

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव —शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छ कोपरगाव, सुंदर कोपरगाव” या शहरव्यापी स्वच्छता अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक ६ मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


या स्वच्छता मोहिमेत नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमादित्य सातभाई यांच्या नेतृत्वाखाली आशिष निकुंभ, यश काले, ओम बागुल, नितीन जोशी, कुणाल कुरे, शुभम भावसार, योगेश अमृतकर, निखिल जोशी, सनी खैरे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराने सक्रिय सहभाग नोंदविला. नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारीही या अभियानात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते.
या प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष श्री. परागजी संधान यांनी सदिच्छा भेट देत स्वच्छतेबाबत सातत्य राखण्याचे आवाहन केले. तसेच श्री. अतुलजी काले व श्री. आनंदजी काले यांनीही उपस्थित राहून अभियानास शुभेच्छा दिल्या.

“स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारे लोकसहभाग वाढवून कोपरगाव शहर स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरेल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील इतर प्रभागांमध्येही हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.














