आपला जिल्हा

सामाजिक बांधिलकीची ३५ वर्षांची परंपरा; ‘आदर्श युथ क्लब’चा सेवाकार्याचा वसा कायम

मनिष जाधव 9823752964

सामाजिक बांधिलकीची ३५ वर्षांची परंपरा; ‘आदर्श युथ क्लब’चा सेवाकार्याचा वसा कायम

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –
सन १९९१ मध्ये स्थापन झालेल्या आदर्श युथ क्लबने नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सुरू केलेली सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचाल आज तब्बल ३५ वर्षांनंतरही तितक्याच उत्साहाने सुरू ठेवली आहे. उत्सवापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रम, आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग तसेच समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या आदर्श युथ क्लबच्या वतीने यावर्षीच्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

ऊ

आदर्श युथ क्लबच्या संस्थापकपदी मुकुंद भुतडा, अध्यक्षपदी विकी जोशी, उपाध्यक्षपदी सनी खैरे, सचिवपदी प्रणव केंदळे, संघटकपदी राहुल आदमाने तर खजिनदारपदी तुषार जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात सामाजिक, सांस्कृतिक तसेच युवकांना आणि बालकांना मैदानी खेळांकडे आकर्षित करणारे विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

ध

 

मंडळाचे संस्थापक मुकुंद भुतडा यांनी आपल्या मनोगतात आदर्श युथ क्लबच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. ३ ऑक्टोबर १९९१ रोजी आदर्श युथ क्लब नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी मंगेश शेंडकर, मिलिंद जोशी, हेमंत डागा, शाम जोशी, शेखर पवार, दीपक गुजराथी, संजय जाधव, संदीप जोशी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळात युवकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या मंडळाने कालांतराने सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला.

गुजरातमध्ये झालेल्या २६ जानेवारी २००१ च्या भीषण भूकंपाच्या काळात आदर्श युथ क्लबने आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. तसेच २०१९ मध्ये कोल्हापूर-सांगली परिसरात आलेल्या महापुराच्या काळातही मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली. नैसर्गिक आपत्ती असो अथवा समाजासमोरील कोणतेही संकट असो, गरज पडल्यास मदतीसाठी पुढे जाण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली असल्याचे भुतडा यांनी नमूद केले.

धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही आदर्श युथ क्लबचा सातत्याने सहभाग राहिला आहे. साई पालखी सोहळ्यात मंडळाच्या वतीने विविध सेवा उपक्रम राबविले जातात. यापूर्वी पालखी सोहळ्यात जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. साई रामनवमी उत्सव सोहळ्यात दरवर्षी मंडळाच्या वतीने सुमारे ११ हजार आईस्क्रीमचे वाटप करण्यात येते. भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासह उत्सवामध्ये सेवा देण्याची परंपरा यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यातही आदर्श युथ क्लब, साई रामनवमी उत्सव समिती, अंबिका तरुण मंडळ आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने दरवर्षी वारकऱ्यांसाठी नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली जाते. वेळापूर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पायी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मसाज, औषधोपचार आणि आवश्यक मदतीचे नियोजन संस्थापक मुकुंद भुतडा व त्यांचे सहकारी करतात. वारकऱ्यांची सेवा करण्याची ही परंपरा पुढेही अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

आपल्या मनोगताच्या शेवटी संस्थापक मुकुंद भुतडा भावुक झाले. ‘मंडळाचे नाव आदर्श युथ क्लब आहे आणि या नावाला साजेसा आदर्श आपण सर्वांनी आपल्या कामातून कायम ठेवावा. प्रत्येकाने एकत्रितपणे सहभागी होऊन सामाजिक कार्याची ही परंपरा पुढे न्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष विकी जोशी यांनीही आपल्या मनोगतात मंडळाशी असलेले जुने नाते आणि भविष्यातील कार्याचा संकल्प व्यक्त केला. सन १९९१ मध्ये मंडळाची स्थापना झाली, त्यावेळी आपण अवघे तीन वर्षांचे असतानाच मंडळाचे सदस्य झालो. संस्थापक आणि माजी अध्यक्षांनी आजवर राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीची असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आदर्श युथ क्लबला भविष्यात कधीही आवाज दिला तर मदतीचा हात सर्वप्रथम पुढे असेल,’ असा विश्वास अध्यक्ष विकी जोशी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात लहान मुले पारंपरिक गणपती उत्सव, नवरात्रोत्सव तसेच मैदानी खेळांपासून काही प्रमाणात दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुलांना पुन्हा मैदानी खेळांकडे, पारंपरिक उत्सवांकडे आणि सामाजिक उपक्रमांकडे वळविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

‘या कार्यासाठी मला सर्व सहकाऱ्यांची मोठी साथ आवश्यक आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आदर्श युथ क्लबची सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचाल आणखी व्यापक करता येईल,’ असेही अध्यक्ष विकी जोशी यांनी सांगितले.

३५ वर्षांचा सामाजिक वारसा, जुन्या कार्यकर्त्यांची प्रेरणा आणि नव्या पिढीचा उत्साह यांचा संगम साधत आदर्श युथ क्लबने यावर्षीही विविध सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. ‘आदर्श’ हे केवळ मंडळाचे नाव न राहता आपल्या प्रत्येक कार्यातून तो आदर्श समाजासमोर निर्माण व्हावा, हीच या बैठकीची प्रमुख भावना ठरली.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!