मौजे माहेगाव देशमुख येथील जप्त वाळू साठ्याचा २९ डिसेंबरला जाहीर लिलाव
शिर्डी, दि.२३ : कोपरगाव तालुक्यातील मौजे माहेगाव देशमुख येथील गोदावरी नदीपात्रातून जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळू साठ्याचा जाहीर लिलाव सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तहसील कार्यालय, कोपरगाव येथे ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये अंदाजे १४३ ब्रास (१३ ढीग) वाळू साठा लिलावासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

सदर लिलावात सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी निविदा अर्जाचे शुल्क ५ हजार रुपये असून, ५० हजार रुपये अनामत रक्कम रोखीने जमा करणे अनिवार्य आहे. वाळू साठ्यासाठी प्रति ब्रास ७७८.५ रुपये अशी हातची किंमत निश्चित करण्यात आली असून, लिलावाच्या सविस्तर अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयातील गौण खनिज शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.














