प्रेम, शांती आणि माणुसकीचा संदेश देत श्री चैतन्य स्कूल मध्ये ख्रिसमस उत्साहात साजरा…!
कोपरगाव मनिष जाधव – .कोपरगाव येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूल मध्ये ख्रिसमस सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भक्तीमय प्रार्थना गीताने करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन मॅडम, ॲकॅडमिक डीन सागर पाटील, पर्यवेक्षक दीपक वक्ते, समन्वयक पूजा चौधरी, सर्व शिक्षक वृंद, बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रेम, शांती व मानवतेचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. लखलखत्या दिव्यांनी आणि ख्रिसमस ट्रीने शाळेला एक वेगळेच तेज प्राप्त झाले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात “जिंगल बेल्स” या ख्रिसमस गीताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ख्रिसमस कॅरोल्स, नृत्याविष्कार, लघुनाट्य व संदेशात्मक गीतांनी येशू ख्रिस्तांच्या जन्माची कथा प्रभावीपणे उलगडली. प्रेम, क्षमा, त्याग व सेवाभावाचा संदेश देणाऱ्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन मॅडम यांनी आपल्या मनोगतातून ख्रिसमस सणाचे सामाजिक महत्त्व विशद केले. “ख्रिसमस हा केवळ सण नसून तो मानवतेची जाणीव करून देणारा उत्सव आहे. विद्यार्थ्यांनी परस्पर सन्मान, सहकार्य व सेवाभाव जोपासावा,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात सांताक्लॉजच्या आगमनाने विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सांताक्लॉजने विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तू वाटप करून आनंद द्विगुणित केला. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उत्स्फूर्त हास्य फुलले.
“ख्रिसमस सेलिब्रेशन” यानिमित्ताने पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. हा ख्रिसमस उत्सव शाळेत एकोपा, आनंद आणि माणुसकीचा संदेश देणारा संस्मरणीय कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक जी. एम. पगारे व आभार प्रदर्शन फरीद पटेल यांनी केले.














