सोलापूर विभागात विभागीय रेल्वे सल्लागार समिती (DRUCC)ची यशस्वी बैठक
पुणे प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील विभागीय रेल्वे सल्लागार समिती (DRUCC)ची बैठक दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) डॉ. सुजीत मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर रेल्वे विभागीय कार्यालयात पार पडली. यावेळी अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री अंशुमाली कुमार यांच्यासह वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक श्री. जे. एन. गुप्ता आणि वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) श्री. सचिन गणेर हे देखील उपस्थित होते.यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. योगेश पाटील यांनी समिती सदस्यांशी समन्वय साधला.
बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना विभागीय व्यवस्थापकांनी सोलापूर विभागातील प्रवासी सुविधा, पायाभूत विकास आणि रेल्वे ऑपरेशन्सच्या सुधारणांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच वेळेवर आणि सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी ट्रॅक देखभाल, सिग्नल प्रणाली बळकटीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान, DRUCC सदस्यांनी रेल्वे प्रशासनासोबत सक्रिय संवाद साधला आणि प्रवासी सुविधांशी संबंधित तसेच विविध परिचालन आव्हानांवर महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. विभागीय व्यवस्थापकांनी या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, सोलापूर विभाग प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. समिती सदस्यांनी सहकार्य करून रेल्वेच्या विकासात, प्रवासी सुविधा विस्तारात आणि महसूल वाढीच्या प्रयत्नांमध्ये योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
सोलापूर विभाग, मध्य रेल्वे, सतत सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि प्रवाशांकडून मिळणाऱ्या सकारात्मक अभिप्रायांचे स्वागत करतो, जेणेकरून अधिक प्रभावी आणि प्रवासीहिताची रेल्वे सेवा उपलब्ध होऊ शकेल.