श्रीम.सुवर्णा फटांगरे यांचे कार्य दिशादर्शक- मा. बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर पंचायत समिती प्रधानमंत्री शालेय पोषण आहार अधीक्षिका व ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. फटांगरे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम दिनांक २८ जुलै रोजी ‘ढोले पाटील लॉन्स येथे संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वरील गौरवोद्गगार काढले. शिक्षण विभागात त्यांच्यावर जी जबाबदारी आली.ती त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत फटांगरे मॅडम यांच्या कार्याचे वर्णन केले. महिला स्व कर्तृत्वाने संधी निर्माण करतात व त्या संधीचे सोने करतात हेच त्यांचे कार्य बघून वाटते असेही त्या म्हणाल्या. पालघर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी त्यांचे बंधू भाऊसाहेब फटांगरे यांनी कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.त्यांचा जीवन संघर्ष कथन केला.
यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी उपसभापती नवनाथ अरगडे, संगमनेर साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांच्यासह अनेक मान्यवरांनी फटांगरे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.
सन्मानाला उत्तर देताना श्रीम.फटांगरे मॅडम भावूक झाल्या. मोठ्या कष्टाने आपल्याला शिक्षिका बनविणाऱ्या वडिल स्व.गंगाधर,आई भागीरथी व बंधू भाऊसाहेब शिक्षिका झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी प्रेरित करणारे शिक्षक पती विलास आवारी सर, तसेच उच्च शिक्षण घेत असताना पाठिंबा देणाऱ्या कन्या सौ.माधुरी,सौ.कोमल व सौ.चंचल यांचा उल्लेख केला.
काम करत असताना सदैव पाठिंबा देणारे व सहकार्य करणारे अधिकारी,पदाधिकारी,सहकारी,शिक्षक व ग्रामस्थ यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार सांभाळताना सर्वांच्या सहकार्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू शकले. त्याला मार्गदर्शन करणारे गटविकास अधिकारी अनिल नागणे लोकसभागासाठी पाठिंबा देणारे डॉ.संजय मालपाणी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
शिवव्याख्याते रवींद्र आगलावे व टिमच्या ‘भजन संध्या’ ने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना दिपाली रेपाळ यांनी मांडली. अनुवादन बी.बी.फटांगरे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ घुले व हरीष आंबरे यांनी केले. आभार प्रदर्शन अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती अजय फटांगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षिकांनी प्रयत्न केले.