रासायनिक अभियांत्रिकी’वर शुक्रवारी (ता. २१) चर्चासत्र
पुणे मनिष जाधव : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सच्या (आयआयसीएचई) पुणे प्रादेशिक केंद्राच्या वतीने रासायनिक अभियांत्रिकीवर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. २१ एप्रिल २०२३ रोजी एमआयडीसी कुरकुंभ येथे हे चर्चासत्र होणार आहे. ‘रासायनिक अभियांत्रिकी तत्वांच्या साहाय्याने रासायनिक प्रक्रिया सुधारणे’ ही चर्चासत्राची मध्यवर्ती संकल्पना आहे. या चर्चसत्रात विविध अकरा विषयांवर चर्चा होणार असून, त्यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), सिप्ला यासह इतर संशोधन संस्थांतील रासायनिक अभियंते व शास्त्रज्ञ उहापोह करणार आहेत.

कुरकुंभ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विकास टोपले यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. सिप्ला कुरकुंभचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश वझे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘एनसीएल’ येथील शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रोडे, डॉ. विनय भंडारी, डॉ. संजय कांबळे आदी चर्चा करणार आहेत, अशी माहिती पुणे प्रादेशिक केंद्राचे अध्यक्ष अलोक पंडित यांनी दिली.