तीन दशका नंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
गुरुजनांच्या उपस्थितीत विद्यार्थी स्नेह संमेलन उत्साहात
अंदरसुल सचिन सोनवणे – मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३४ वर्षांनी शाळा भरवीत जुन्या आठवणींना उजाळा दिला सोशल मीडियाच्या माध्यमातुन एकत्रित येत सन १९८८-८९ साली इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या सुमारे १२५ माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी भाऊबीजेच्या (दि.१५) मुहूर्तावर एकत्रित येत तत्कालीन गुरुजनां समवेत स्नेहसंमेलन मेळाव्यास मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला शाळेच्या मैदानात सामुहिक प्रार्थना व राष्ट्रगीताने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आपण शिक्षण घेतलेल्या वर्गातील बाकावर बसुन शिक्षकां करवी अभ्यासाचे धडे गिरवत गत स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी आपल्यातील दिवंगत विद्यार्थ्यांचे स्मरण करून श्रद्धांजली अर्पण केली यामध्ये स्थानिक तसेच विविध क्षेत्रातील नोकरी व्यवसाया निमित्त बाहेरगावी असणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, अभियंता, व्यावसायिक तसेच सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत एकमेकांच्या परिवारातील सदस्यांची सुख-दुःखा सोबतच सध्या कार्यरत असलेल्या नोकरी व व्यवसाय संबंधी परिचय केला आपल्याला शिक्षणरूपी ज्ञान देणाऱ्या गुरुजनां प्रति विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली शैक्षणिक काळातील जुन्या आठवणीत रममाण होतांना शिक्षक व विद्यार्थी कधी भावूक तर कधी आनंदी झाल्याचे चित्र बघायवास मिळाले तब्बल तीन दशकाहून अधिक काळानंतर शालेय मित्र व शिक्षकांच्या भेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता यावेळी विद्यार्थिनींनी आपण शिक्षण घेतलेल्या ज्ञान मंदिराची प्रतिमा विद्यार्थी व गुरुजनांना भेट दिली स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक रामदास गोसावी, राजेंद्र पाटील,भालचंद्र पाटील,आत्माराम पवार, जिजाबाई सोनवणे आदीसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी विद्यार्थिनी ;मायताई माळी
आज 34 वर्षांनंतर शाळेतील शिक्षक, मैत्रिणी,व वर्गबंधुंना भेटण्याचा योग आल्याने शालेय आठवणींना उजाळा मिळाला व भाऊबीजेचा आनंद द्विगुणित झाला हे केवळ सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शक्य झाले
सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र पाटील
36 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षण सेवा काळात अनेक विद्यार्थ्यांना अध्यपन केले परंतु 34 वर्षापूर्वीचे विद्यार्थ्यांनी आज आठवण करून शाळेत निमंत्रित केल्याने त्यांना भेटुन मन भारावून गेले
विद्यार्थ्यांचा असलेला स्नेह आयुष्यभर अविस्मरणीय राहील.