‘सिनर्जी’तून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : देवयानी पवार
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ बिझनेस अँड लीडरशिपमध्ये वार्षिक महोत्सव
पुणे प्रतिनिधी – “विद्यार्थ्यांना ‘सिनर्जी’ सारख्या वार्षिक महोत्सवातून त्यांच्यातील कलागुण प्रदर्शित करण्याची संधी मिळते. महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या महोत्सवातून त्यांच्या सर्वांगीण विकासाला वाव मिळतो,” असे प्रतिपादन डीपी हाऊस ऑफ मीडियाच्या संस्थापक देवयानी पवार यांनी केले. यशस्वी होण्यात वैयक्तिक ब्रॅण्डिंग महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ बिझनेस अँड लीडरशिपमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांना ऊर्जा देणारा ‘सिनर्जी’ महोत्सव नुकताच झाला. त्याच्या वार्षिक बक्षीस वितरणप्रसंगी देवयानी पवार बोलत होत्या. एलटीआय माईंड ट्रीचे ग्लोबल हेड (कम्युनिकेशन) अमित गजवानी यांच्यासह ‘एमआयटी’चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. तपन पांडा, अधिष्ठाता डॉ. दीपेंद्र शर्मा यांच्यासह सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर पहिल्यांदाच झालेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कुटुंबीय यांच्यात उत्साह होता. विविध कला, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांतून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध कला गुणांचे प्रदर्शन केले. फेस पेंटिंग, मेहंदी, रांगोळी, टग ऑफ वॉर, बेस्ट आऊटफिट या स्पर्धांसह रेट्रो डे, ट्विन डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे असे विविध दिवस साजरे करण्यात आले. नाट्य, नृत्य, गायन, फॅशन व इतर कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. यावेळी ‘कॅम्पस क्रॉनिकल्स’ या न्यूजलेटरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
सहकार्य भावनेतून काम करण्याचे महत्व सांगताना अमित गजवानी म्हणाले, तात्पुरत्या स्वरूपाचे निर्णय घेण्याचे टाळायला हवे. स्वतःच्या समाजाच्या प्रगतीसाठी दूरदृष्टीने काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक व अभ्यासक्रमेतर उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. दीपेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पल्लवी आद्य, प्रा. सदानंद पेटकर आणि सहकाऱ्यांनी महोत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.