संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा पार्थ भिंगारे चमकला राष्ट्रीय स्पर्धेत
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी कु. पार्थ चंद्रकांत भिंगारे याने नाशिक येथे पार पडलेल्या २२ व्या जंप रोप सीनियर नॅशनल व ६ व्या ऑल इंडिया जंप रोप चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत दिमाखदार कामगिरी नोंदवली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत *डबल डच स्पीड रिलेस 4×30* या प्रकारात पार्थने अप्रतिम कौशल्य, वेग आणि समन्वय दाखवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशामुळे केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण कोपरगाव शहराचा अभिमान उंचावला असून क्रीडा क्षेत्रातही शहराची ओळख ठळक झाली आहे.

या उल्लेखनीय यशामागे क्रीडा शिक्षक श्री. राहुल रूईकर यांचे कुशल मार्गदर्शन, अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याची वृत्ती अधोरेखित होते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळेच पार्थने राष्ट्रीय पातळीवर स्वतःची छाप पाडत उत्कृष्टतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
स्पर्धेत यश मिळविल्या बद्दल स्कूल चे प्राचार्य श्री. मोहसीन शेख यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, पार्थचे यश हे त्याच्या कष्ट, शिस्त आणि समर्पणाचे फळ आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे शाळेचा नावलौकिक वाढत असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मोहसीन शेख म्हणाले.
पार्थच्या या यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे साहेब, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री विवेक भैय्या कोल्हे, स्कूलचे मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुका कोल्हे, यांनी विशेष अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत पार्थवर कौतुकाचा वर्षाव केला.
पार्थची ही कामगिरी केवळ एक यश नसून, ती मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी ठरत आहे. भविष्यात तो आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवत देशाच्या क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवेल, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.














