
विखे – परजणे गटाची बैठक संपन्न
बैठकीतील चर्चा मात्र गुलदस्त्यात
कोपरगांव प्रतिनिधी – जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या नेतृत्वात कोपरगांव तालुका व शहरातील विखे – परजणे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली असली तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबतचा तर्क या बैठकीतून काढला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीसाठी तालुक्यातील जवळ जवळ सर्वच गावामधून ज्येष्ठ व प्रमुख कार्यकर्त्यांची लक्षवेधी उपस्थिती असल्याचे समजले. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची झालेली प्रचंड हानी आणि संकटात सापडलेल्या शेतक-यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाई संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे समजले. याबरोबरच कोपरगाव तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, अरोग्य तसेच दुग्धव्यवसायाबरोबरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना बैठकीत व्यक्त केल्याचेही वृत्त आहे
दरम्यान आगामी सर्वच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच विखे – परजणे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या या बैठकीला विशेष महत्व दिले जात आहे. आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेत आम्हाला स्वातंत्र्य द्या अशाही प्रतिक्रिया काही कार्यकत्यांनी व्यक्त केल्याचे समजले एकंदरीतच या बैठकीतील मूळ चर्चा गुलदस्त्यात असली तरी आगामी रणनीती काय ठरली याबाबत मात्र तर्क वितर्काना उधान आलेले आहे.