मोहसिन शेख व दिपक बोळींज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिमान वाढविणारा क्षण
कोपरगाव मनिष जाधव : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव या संस्थेने पुन्हा एकदा राज्यस्तरावर मानाचा ठसा उमटविला आहे. शाळेचे प्राचार्य श्रीमान मोहसिन शेख सर यांना “राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार” तर शाळेचे समन्वयक व वरिष्ठ शिक्षक श्रीमान दिपक बोळींज सर यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था नेवासा यांच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक गौरव समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यभरातील अनेक गुणवंत शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. त्यात संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे दोन्ही शिक्षकांचा समावेश झाल्याने संस्थेचा मान अधिक उंचावला आहे.
प्राचार्य मोहसिन शेख सर हे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने भर घालत आहेत. शिस्तबद्ध, नवकल्पक व विद्यार्थी केंद्रित शिक्षणपद्धती त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेत विकसित झाली आहे. त्यांनी शिक्षक व पालक यांच्यात संवादाचे सेतू बांधून शिक्षण अधिक परिणामकारक केले आहे.
तर समन्वयक दिपक बोळींज सर यांनी शिक्षणासोबत संस्कारांवरही विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यामध्ये प्रोत्साहन देत त्यांनी सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य केले आहे.


या दोन्ही मान्यवरांचा सन्मान झाल्याबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व आपल्या संस्थेचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे तसेच संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई विवेक भैय्या कोल्हे यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी , स्थानिक मान्यवरांनी या दोन्ही शिक्षकांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत भविष्यातही अशाच कार्याने शाळेचा लौकिक वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या.














