माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही
जनतेशी नाळ जपणारे नेतृत्व आता कोणती दिशा घेणार?
कोपरगाव मनिष जाधव : कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून शहरात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, काहींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी अजूनही मौनच पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मंगेश पाटील हे कोपरगावच्या राजकारणातील एक लोकप्रिय आणि सर्वमान्य नाव आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. त्यामुळे त्यांच्या कामकाजाच्या काळाची आठवण आजही अनेक नागरिक प्रेमाने काढतात.

मंगेश पाटील यांच्या कार्यशैलीमुळे ते केवळ राजकीय नेते न राहता जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतल्याने त्यांचा संपर्क सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचला. त्यामुळेच आजही त्यांचे नाव घेतले की नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहीजणांचे मत आहे की ते पुन्हा एकदा सक्रिय होतील, तर काहींना वाटते की ते योग्य वेळी कोणाला तरी पाठिंबा देतील. त्यांच्या एका निर्णयामुळे काही प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने राजकारणात त्यांच्या नावाची चर्चा कायम आहे.
मंगेश पाटील यांनी आजवर कधीही गाजावाजा न करता काम केले. शांत पण प्रभावी नेतृत्व, लोकांशी जवळीक आणि निर्णयक्षम वृत्ती हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे ते कोणती भूमिका घेतात, हे पाहणे सर्वांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
सध्या मात्र त्यांनी कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. शहरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या पुढील घोषणेकडे अपेक्षेने पाहत आहेत. कोपरगावच्या राजकीय वातावरणात त्यांच्या निर्णयाची निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे, यात शंका नाही.













