
आ.आशुतोष काळे यांच्यासह काळे परिवारातील सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
प्राधान्याने मतदानाचे कर्तव्य पार पाडा-आ. आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर :- लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत असून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघाचा देखील यामध्ये समावेश आहे. माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या निवडणूक केंद्रात जावून आ.आशुतोष काळे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. माजी आमदार अशोकराव काळे,गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे,अभिषेकदादा काळे या सदस्यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला.


यावेळी आ.आशुतोष काळे यांनी मतदारांना आवाहन करतांना ते म्हणाले की, आपल्याकडे लोकशाही पद्धत आहे. आपल्याला लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क प्रदान केले आहेत. त्यापैकी मतदान हा सर्वांचा महत्त्वाचा हक्क व अधिकार आहे. त्यामुळे या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करून मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. सुदृढ व सक्षम लोकशाहीतून आपल्या देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास मदत होवून विकासाला गती मिळते. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून या देशाचा सुजाण नागरिक या नात्याने सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपल्या मतदानाच्या स्वरूपात सहकार्य करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.















