प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादींचा विजयघोष; भुतडा–फंड यांचे शक्तिप्रदर्शन ताकदवान रॅली
कोपरगाव प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश दादाप्पा काका कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मुकुंद रामेश्वर भुतडा आणि सारिका सुनील फंड यांच्या प्रचार मोहिमेला आज दणदणीत सुरुवात झाली. भव्य रॅली, ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि महिला-युवकांचा मोठा सहभाग यामुळे संपूर्ण प्रभागात निवडणूक उत्साहाचे वातावरण रंगून गेले.

प्रचार फेरीत उमेदवारांनी प्रत्येक घर ना घर तसेच परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन स्थानिक समस्या समजून घेत त्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस आराखडा तयार असल्याची माहिती त्यांनी मतदारांना दिली. “प्रभागाचा चेहरामोहरा बदलणे, मूलभूत सुविधांवर भर देणे आणि नागरिकांना विश्वासार्ह प्रशासन देणे हे आमचे ध्येय आहे,” असा विश्वास मुकुंद भुतडा यांनी व्यक्त केला.

सारिका फंड यांनी महिलांसाठी सुरक्षित परिसर, युवकांसाठी रोजगारपर संधी आणि वृद्धांसाठी उपयुक्त योजना राबवण्याचा मनोदय व्यक्त केला. “जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हेच आमचे बळ; त्याला न्याय देणे ही आमची जबाबदारी,” असे त्या म्हणाल्या.

प्रचार फेरीत कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध उपस्थिती, आकर्षक फलक, घोषणाबाजी आणि नागरिकांचा वाढता उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची लढत प्रभाग ६ मध्ये अधिक भक्कम होताना दिसत असुन आयोजित केलेल्या प्रचार फेरीमध्ये युवक, ज्येष्ठ मार्गदर्शक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.













