पवार साहेबांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध
कोपरगाव प्रतिनिधी :- शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्ल मला मनस्वी नितांत आदर असून सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या पातळीवरील केलेली टीका महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करू शकत नाही आणि हि महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती देखील नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
सदाभाऊ खोत यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर केलेल्या टीकेचा आ.आशुतोष काळे यांनी जाहीर निषेध नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, राजकारणात मतमतांतरे असतात त्याप्रमाणे टीका टिप्पणी देखील होत असते. परंतु त्या टीका टिप्पणीला विशिष्ट मर्यादा आहेत.या मर्यादा पार करण्याची आपल्या सुसंकृत महाराष्ट्र राज्याची संस्कृती अजिबात नाही.त्यामुळे कुणावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो व काय बोलतो याची खातरजमा करून आपण आपली राजकीय पातळी ओळखली पाहिजे.
राज्यातीलच नव्हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ राजकारणी शरदचंद्रजी पवार साहेब यांची देशाच्या राजकारणात वेगळी उंची आहे. त्यांच्याबाबत प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतांना मुद्देसूद टीका करीत आले आहे. त्याचा आदर्श अशा वाचाळवीरांनी घेतला पाहिजे आणि जाहीर सभेत बोलतांना भान राखून बोलले पाहिजे. आपल्या राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपतांना कुणावरही टीका करतांना आपली वैचारिक पातळी जपणे अत्यंत गरजेचे असून सदाभाऊ खोत यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर एकेरी शब्दांत केलेल्या अभद्र टीकेचा जाहीर निषेध करीत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.