तुम्हाला निवडणूक हवी होती तर त्यावेळी कशाला कोर्टात गेले -सुनील गंगुले
कोळपेवाडी वार्ताहर :- छाननीच्या वेळी आक्षेप घेतला नाही आणि त्यानंतर विरोधी गटासह सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करावेत यासाठी न्यायालयात गेले नसते तर कशाला निवडणुका पुढे ढकलल्या असत्या. आता पत्रकार परिषद घेवून निवडणुक झाली पाहिजे असे गळे काढून सारवासारव करण्यापेक्षा निवडणूक पाहिजे होती तर त्यावेळी कशाला कोर्टात गेले असा खोचक सवाल करत कोपरगाव शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनिक गंगुले यांनी मा.आ.स्नेहलता कोल्हे यांना लक्ष केले आहे.
ते म्हणाले की, कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत पराभव होईल या भीतीपोटी कोल्हे गटाने आपल्या गटाचे ३१ अर्ज सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उमेदवारांसह इतर पक्षाचे व अपक्ष लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवत असलेल्या सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द करावे यासाठी आक्षेप घेवून याचिका दाखल केल्या होत्या. त्याबाबत सुनावणी होवून कोर्टाने कोल्हे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांची उमेदवारी अर्ज वैध ठरविले होते. मात्र ज्यांची चांगल्या कामाला आडवे जायची सवय आहे त्यांनी या निवडणुकीलाही आडवे जावून त्यांच्या कुटील नीतीमुळे होवू घातलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

माजी आमदार म्हणतात की, निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय हा काही फक्त कोपरगाव पुरताच मर्यादित नाही तर बारामतीची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे याचा त्यांना कुठेतरी आसुरी आनंद झाला असल्याचे त्यांनी सारवासारव करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. त्यांनी कोपरगाव बरोबरच बारामतीचा निवडणुकीचा जरी विषय काढला असला तरी ज्याप्रमाणे कोपरगावात कोल्हे यांच्यासारखे विघ्नसंतोषी लोक आहेत तसेच काही विघ्नसंतोषी लोक बारामतीत देखील असतील त्यामुळे बारामतीचीही निवडणुक पुढे ढकलली आहे. कोल्हे गटाने सर्व उमेदवारांना जो मनस्ताप दिला आहे त्याबद्दल कोपरगावकरांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. याचा कोपरगावचे सुज्ञ मतदार ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी आपला रोष नक्कीच व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही असे सुनील गंगुले यांनी शेवटी म्हटले आहे.














