अंगावर वाघाची झूल घेतली म्हणजे टायगर होत नाही – खा. निलेश लंके
राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आमदार थोरात असतील
संगमनेर (प्रतिनिधी)–थोरात घराणे हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व अत्यंत सुसंस्कृत घराणे आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन विकासाचा मार्ग दाखवणारे हे घराणे आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलीबद्दल बेताल वक्तव्य करणे ही घटना महाराष्ट्राला कलंकित करणारी दुर्दैवी घटना असून अंगावर वाघाची झुल घेतली म्हणून मांजर टायगर होत नाही अशी घाणाघाती टीका करताना दडपशाही करणारे हे आहे म्हणून दक्षिणेतील जनतेने यांची जिरवली असल्याची टीका खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
संगमनेर येथील काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी खासदार निलेश लंके यांनी डॉ जयश्रीताई थोरात यांची भेट घेतली. यावेळी मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, मिलिंद कानवडे सोमेश्वर दिवटे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, नितीन अभंग, सिताराम राऊत, ऋतिक राऊत, सौ दिपाली वर्पे, शितल उगलमुगले, विजय राहणे आदींसह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेते आहेत. राज्याच्या विकासात थोरात घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढत आहेत. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक जण हा आमदार थोरात असून सर्व जनता त्यांची प्रचारक आहे. राज्यांमधून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणाऱ्या पहिल्या पाच उमेदवारांमध्ये आमदार थोरात असणार आहेत.
त्यांच्याविरुद्ध लढणे हे फक्त स्वतःचे ब्रॅण्डिंग करणे आणि टीआरपी वाढवण्यासाठी विखे यांचा उद्योग आहे. संगमनेर तालुका त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे महिला भगिनींनी बाबद असे बेताल वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे .
थोरात घराणे हे अत्यंत सुसंस्कृत घराणे आहे. डॉ जयश्रीताई थोरात या सर्व समाजाला घेऊन पुढे जात आहे त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा संपूर्ण राज्याने निषेध केला आहे. खरे दहशत करणारे कोण आहेत ते आता सर्वांना कळले आहे यांच्या दहशतीमुळे दक्षिणेतील जनतेने यांना पराभूत करून त्यांची जिरवली आहे. आता संगमनेर ची जनता आणखी जिरवणार आहे. थोरात घराण्याची संस्कार कसे आहे ते आपण सर्वजण त्यांचे वागणे बोलणे यावरून पाहतो याउलट विखे यांचे संस्कार कसे आहे हे त्यांच्या भाषणांमधून कळतात. अशा दडपशाही व दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना सर्वांनी एकत्र येऊन वेळीच रोखावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याशी चर्चा करून संपूर्ण आहिल्या नगर जिल्हा हा तुमच्यासोबत आहे असा धीर देऊन लढत रहा सर्व भाऊ तुमच्या सोबतीला आहेत असे सांगितले.