पोहेगाव सबस्टेशन मधून शेतीला दिवसा वीज पुरवठा करा
अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे यांचा इशारा
कोपरगाव (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात अनेक परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. याला पोहेगाव परिसर देखील अपवाद नाही. बिबट्याच्या धास्तीने रात्री शेतात शेतीला पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक झाले आहे. थंडीची लाट व वन्य प्राण्यांची दहशत यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तातडीने परिसरात पोहेगाव सबस्टेशन मधून शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. संगमनेरचे कार्यकारी अभियंता यांच्या कडे केली आहे. १० जानेवारी २०२६ पर्यंत शेती साठी दिवसा वीज पुरवठा सुरू केला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे शासनाच्या धोरणाप्रमाणे सगळीकडे शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. परंतु पोहेगाव सबस्टेशन येथून अद्यापही शेतीला रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे.सध्या थंडीचे दिवस असून तसेच सगळीकडे बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे वेळी पिकांना पाणी भरणे मोठे जिकीरीचे झालेले आहे. रात्रीचा वीज पुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे शेतीला दिवसा वीज पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे येत्या दि.१०/०१/२०२६ पर्यंत पोहेगाव सबस्टेशन येथून शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा सुरु न झाल्यास ११जानेवारी रोजी पोहेगाव येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही आपली राहील असेही नितीन औताडे यांनी स्पष्ट केले आहे. निवेदनाच्या प्रति उपकार्यकारी अभियंता, राहाता व कनिष्ठ अभियंता पोहेगाव सबस्टेशन यांना पाठवण्यात आल्या आहेत.














