कोपरगावच्या अभिषेक जोशीची सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाजी
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव येथील गुळ व्यापार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले स्वर्गीय कांतीलाल हरलाल जोशी यांच्या कुटुंबातील तरुण अभिषेक मनोज जोशी याने चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही अत्यंत प्रतिष्ठेची व कठीण मानली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे जोशी परिवाराचा मान उंचावला असून संपूर्ण कोपरगाव परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
अभिषेक हा स्वर्गीय कांतीलाल हरलाल जोशी यांचा नातू तसेच मनोज कांतीलाल जोशी यांचा सुपुत्र असून नरेश जोशी यांचा पुतण्या आहे. त्याच्या या यशामुळे जोशी परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कुटुंबात दुसरा सीए होण्याचा मान अभिषेकने मिळवला असून त्याने आपल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

स्वर्गीय कांतीलाल हरलाल जोशी हे कोपरगावातील गुळ व्यापार क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नाव म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी आणि जिद्दीमुळे जोशी कुटुंबाने व्यापारात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा प्रभाव अभिषेकच्या यशामागे प्रेरणादायी ठरल्याचे कुटुंबीय सांगतात. जोशी कुटुंबात आजही स्वर्गीय कांतीलाल जोशी यांचे एक वाक्य आवर्जून आठवले जाते – “जहा ना जाये बैलगाडी, वहा जाये मारवाडी.” जिद्द, धडाडी आणि कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्याची वृत्ती दर्शवणारे हे वाक्य अभिषेकने आपल्या यशातून खऱ्या अर्थाने सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. अभिषेक जोशीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कोपरगावातील व्यापारी वर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.













