समाजकल्याण विभागात महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने एकांकिका स्पर्धा व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म दिवस महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध विभागच्या समन्वयाने चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व ‘मी सावित्रिबाई बोलतेय’ किंवा ‘मी ज्योतिबा फुले बोलतोय’ या विषयांवर एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हास्तरावर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, अहमदनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन व स्पर्धांचे बक्षिस वाटप समारंभाचे नियोजन करण्यात आलेले आहे. असे आवाहन ही श्री.देवढे यांनी केले आहे.