आपला जिल्हा

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण

मनिष जाधव 9823752964

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण

ई

मानवी जीवनाचे अंतिम ध्येय परमात्म्याची प्राप्ती करणे हेच आहे, आणि त्यासाठी ध्यानाचा पथ हाच राजमार्ग आहे. गुरुदेव आत्मा मालिक माऊलींनी हेच तत्त्वज्ञान वर्षानुवर्षे भाविकांना सांगून त्यांना आत्मप्राप्तीच्या वाटेवर आणले आहे. परंतु, निर्गुणाकडे जाताना सुरुवातीला सगुण मार्गाचाच अवलंब करावा लागतो, हेही तितकेच खरे. गुरुदेव अनेकदा सांगतात, आत्म्याची प्राप्ती हा जणू पदवीचा अभ्यास आहे. ज्याच्या जीवनात भक्तीचे काहीच स्थान नाही किंवा नास्तिक असलेल्याला थेट ध्यानमार्गाद्वारे आत्मप्राप्ती कदापि शक्य नाही. कारण, त्यासाठी त्याच्या मनात भक्तीची निर्मिती, उपासनेची भावना, आत्मप्राप्तीचे सत्त्व तयार झालेले नसते. त्यासाठीच प्रत्येक साधकाला नवविधा भक्तीचे मार्गक्रमण आत्मज्ञानी ऋषीमुनी, संतांनी दिलेले आहे. अर्थात, भजन, पूजन, कीर्तन, श्रवण, अर्चन, मनन आदी मार्गाने आत्मनिवेदनापर्यंत पोहचावे लागते. जसे शिशूवर्गात बालकांना फक्त खेळणी दिली जातात, नंतर त्यांना विविध आकारांच्या माध्यमातून हळूहळू अक्षरओळख, रंगओळख करून दिली जाते. त्यानंतर पहिलीत वाक्ये तयार करणे, वाचणे, दुसरीत जोडाक्षरे आदी शिकविले जाते. हळूहळू टप्प्याटप्प्याने ते जसजसे पुढे जातात, तसतसा त्यांचा अभ्यास कठीण होत जातो, परंतु त्या अभ्यासाची आधीच्या वर्षी पार्श्वभूमी तयार झालेली असल्याने तो सहजसाध्य होतो. तसेच ध्यानाचेही आहे. ध्यानाच्या पदवीपर्यंत जायचे असेल तर त्यासाठी भजन, कीर्तन, पारायण, प्रत्यक्ष सद्‌गुरूंच्या मुखकमलाचे दर्शन आणि मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्गुणाकडे जाण्याचा अर्थात आत्म्याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. स्वतः गुरूदेव आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त करीत असताना त्यांनी भाविकांसाठी देशभरातील तीर्थयात्रांचे आयोजन केले, अनेक मंदिरांत मूर्तीची प्रतिष्ठापना केली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारदेखील केला, अनेक पूजनविधींमध्ये स्थापना करून आपल्या करकमलांद्वारे हवनांमध्ये पूर्णाहुती दिली व या सगळ्या माध्यमातून भोळ्या भाबड्या भक्तांना आत्मचिंतनाकडे सन्मुख केले. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नव्हे, तर परस्परपूरक आहेत. पूजा-अर्चा, पारायणे, भजन-कीर्तन आदींतून मनाच्या जमिनीची भक्तिमार्गासाठी मशागत होते आणि मग त्यात आत्मज्ञानाचे पीक डौलाने डोलू लागते.

अ

सगुण पूजा ही भारतीय आध्यात्मिक परंपरेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती मानवी मनाला ईश्वराशी जोडण्याचा एक सुलभ आणि प्रत्यक्ष मार्ग प्रदान करते. मानवी मन स्वभावतः मूर्त आणि स्थूल गोष्टींशी सहजपणे जोडले जाते. सगुण पूजा, ज्यामध्ये मूर्ती, प्रतिमा, मंदिरे किंवा विशिष्ट पूजाविधींचा समावेश होतो, ही मनाला एकाग्र करण्यासाठी आणि भक्तीचा भाव जागृत करण्यासाठी एक साधन म्हणून कार्य करते. बाह्य प्रपंचात नाशवंत जगात अडकलेले मन अन्य वस्तू पदार्थांचा भोग घेत व नशेच्या अधीन राहून मद्यधुंद व्याभिचारी जीवन जगत असतात. अशा दिशाहीन माणसाला आध्यात्मितेकडे वळविण्यासाठी गुरुदेवांनी याच पद्धतीने साधनाव्रतांचे क्रमण केले. स्वतः गुरुदेवांनी अखंड पारायणांचे आयोजन केले. आजही ती परंपरा अनेक आश्रमांमध्ये सुरू आहे. यातून भक्ताला संतसान्निध्यामध्ये, मंदिरांमध्ये अथवा गुरुस्थानावर येण्याचा योग येतो. या सर्व प्राथमिक भक्तीतून त्याचे चित्त हळूहळू अंतर्मुख व्हायला मदत होते. तो सगुणाची पूजा करता करता निर्गुण निराकार ईश्वराच्या दिशेने प्रगती करू लागतो.

ऊ
Oplus_16777216

मानवी मनासाठी सुलभ
मानवी मनाला निराकार, अमूर्त संकल्पनांचा विचार करणे सुरुवातीला कठीण वाटते. सगुण पूजा मूर्ती, प्रतिमा किंवा प्रतीकांच्या माध्यमातून ईश्वराला मूर्त रूपात पाहण्याची संधी देते. उदाहरणार्थ, गणपती, विष्णू, शिव किंवा देवी तसेच विश्वात्मक गुरुदेवांनी प्रकट केलेली आत्मरूपाची प्रतिमा आदींच्या पूजेतून भक्ताला अंतरात्म्याशी भावनिक नाते जोडता येते. याच सर्व सगुण माध्यमातून भक्ताचा हृदयस्थित आत्म्याशी एक भाव दृढ होतो. उदाहरणार्थ दास्यभाव, सौख्यभाव, प्रेमभाव, बंधूभाव अशा विविध भावात्मक चित्तातून परमेश्वराप्रतीचा भाव दृढ होतो. त्याचे चित्त स्थिर होत जाते आणि तो आत्मस्वरूप सद्गुरूंच्या चरणी निस्सीम होतो.

भक्तीचा आधार :
सगुण पूजा ही भक्तीचा पाया मजबूत करते. पूजा, अर्चना, भजन, कीर्तन, आरती यांसारख्या कर्मकांडांमुळे भक्ताच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना निर्माण होते. याच कर्मामुळे भक्ताला नियमितपणे अंतरात्म्याचे स्मरण राहते व तो स्वस्वरूपाशी संलग्न राहतो. जे आत्मोद्धारासाठी आवश्यक आहे.

आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी :
सगुण पूजा ही आध्यात्मिक साधनेची प्रारंभिक पायरी आहे. ती मनाला शुद्ध करते, एकाग्रता वाढवते आणि भक्ताला आत्मचिंतनासाठी तयार करते. उदाहरणार्थ, मंत्रजप, पूजाविधी किंवा व्रत-वैकल्ये यांमुळे भक्ताचे मन सात्त्विक बनते आणि तो उच्च आध्यात्मिक आत्मिक स्तराकडे वाटचाल करू शकतो.

सामाजिक आणि सांस्कृतिक एकता :
सगुण पूजनाच्या संमेलनांमुळे समाजात एकता आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन होते. मंदिरे, उत्सव, आणि सामूहिक पूजा यांमुळे भक्तांना एकत्र येण्याची संधी मिळते, ज्यामुळे सामाजिक बंध दृढ होतात. सामूहिक रीतीने उपासना झाल्यामुळे व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जीवन पवित्र, शुद्ध व चैतन्यमय बनण्यास मदत होते.

भावनिक आधार :
सगुण पूजा भक्ताला भावनिक आधार देते. दुःख, संकटे किंवा जीवनातील आव्हानांमध्ये भक्त मूर्तीसमोर, आपल्या आत्मस्वरुपाच्या प्रतिमेसमोर विराजमान होऊन विधीवत पूजेअंती आपली भावना प्रार्थनेच्या माध्यमातून प्रकट करतो. हृदयस्थित अंतरात्म्याला साद घालण्यासाठी याच पद्धतीने तनाची व मनाची पूर्वतयारी करावी लागते. मगच, स्वस्थानी विराजमान असणाऱ्या आत्मरुपापर्यंत आपली आंतरिक हाक पोहचते. यासाठीच प. पू. गुरुदेव माऊलींनी गुरुपूजन अर्थात आत्मस्वरुप मंदिरातील संकल्पविधीच्या पूजेची परंपरा दिलेली आहे. आजपर्यंत हजारो भाविकांची याच माध्यमातून पूजा-संकल्प करून आत्मदेवतेच्या प्रसन्नतेमुळे इच्छापूर्ती झालेली आहे.
सगुणाकडून निर्गुणाकडे
सगुण पूजा ही निर्गुण भक्तीपर्यंत पोहोचण्याची एक साधन आहे. हा मार्ग हळूहळू मनाला स्थूलतेपासून सूक्ष्मतेकडे आणि मूर्ततेपासून निराकाराकडे घेऊन जातो. सगुण भक्तीशिवाय निर्गुणाची ओळख होणे हे अशक्य आहे.

प्रारंभिक एकाग्रता आणि श्रद्धा :
सगुण पूजेद्वारे भक्ताचे मन एकाग्र होते आणि त्याच्या मनात ईश्वराविषयी श्रद्धा निर्माण होते. मूर्ती किंवा प्रतीक हे ईश्वराचे दृश्य स्वरूप असते, जे भक्ताला केंद्रित राहण्यास मदत करते. उदाहरणार्थ, आत्मस्वरूपाच्या प्रतिमेसमोर पूजाविधी करून भक्ताला गुरूदेवांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण होते. निराकार आत्म्याचा आकार चिंतनामध्ये आणण्यास सुलभता होते. त्यामुळे त्याचे चंचल मन शुद्ध सात्विक बनून स्थितप्रज्ञ बनते.

आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण :
सगुण पूजेच्या नियमित अभ्यासाने भक्त आत्मचिंतनाकडे वळतो. पूजा, जप, ध्यान यांमुळे तो आपल्या अंतर्मनाचा शोध घेऊ लागतो. यातून त्याला ईश्वर हा बाह्य मूर्तीपुरता मर्यादित नसून, तो सर्वत्र आणि प्रत्येकात आहे, याची जाणीव होते. परंतु, यासाठी प्रारंभ मात्र सगुणातूनच करावा लागतो.
भगवद्रीतेत (अध्याय ६, श्लोक ३०) श्रीकृष्ण म्हणतात,
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति
अर्थात, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो, तो माझ्यापासून वेगळा होत नाही. म्हणजेच, परमात्मा जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, यत्र-तत्र-सर्वत्र, चराचरांत विराजमान आहे, याची अनुभूती यायला सुरुवात होते.

साकाराकडून निराकाराकडे :
सगुण पूजेच्या माध्यमातून भक्ताला हळूहळू ईश्वराच्या निराकार स्वरूपाची जाणीव होते. मूर्ती, प्रतिमा किंवा आकार हे केवळ प्रतीक आहे आणि खरा ईश्वर सर्वव्यापी, निराकार आणि निर्गुण आहे, हे समजण्यास सुरुवात होते. उदाहरणार्थ, संत तुकाराम महाराजांनी सगुण भक्तीपासून सुरुवात केली, पण त्यांच्या भक्तीचा शेवट निर्गुण भक्तीत झाला. त्यांच्या अभंगातून पंढरीनाथा, तुझ्या ठायी निराकार अशी उक्ती दिसते.

अद्वैत आणि निर्गुण भक्ती :
सगुण पूजेच्या माध्यमातून भक्त जेव्हा ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाला समजतो, तेव्हा तो अद्वैत तत्त्वज्ञानाकडे वळतो. यातून त्याला अहं ब्रह्मास्मि (मीच ब्रह्म आहे) ही जाणीव होते, जी निर्गुण भक्तीचा पाया आहे. अद्वैत वेदांतानुसार, सगुण पूजा ही मनाला शुद्ध करण्याचे साधन आहे, ज्यामुळे भक्ताला अंतरात्म्याशी ऐक्य साधता येते. मग तो कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन निर्गुण, निराकार आत्मस्वरूपात रममाण होतो.
सद्‌गुरूंनी काय सांगितले?
ज्या महापुरुषांना आत्मानुभूती झाली, त्यांनी आपली अनुभूती साधकांना, संतांना समजावी, त्यासाठी प्रेरीत व्हावं, म्हणून आलेली आत्मानुभूती शब्दांत उतरवली व ग्रंथनिर्मिती झाली. भारूडे रचली, ओव्या लिहिल्या व पुढील पिढीसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुखकर केला.
संत कबीरसाहेब, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सगुण भक्तीपासून सुरुवात करून निर्गुण भक्तीपर्यंतचा मार्ग दाखवला.

उपनिषदांमध्ये सगुण उपासनेला प्रारंभिक पायरी मानले आहे, ज्यामुळे भक्ताला निराकार ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणूनच प. पू. सद्‌गुरूदेवांनी आत्मस्वरूप प्रतिमेच्या सगुण पूजेचे महात्म्य सांगितले व या पूजनातून निर्गुण भक्तीला उदयास आणले. गुरुदेव सांगतात, प्रतिमा अथवा मूर्ती ही ईश्वराची खिडकी आहे, ज्यातून निराकाराचे दर्शन होते.

सगुण पूजा ही भक्तीचा प्रारंभिक मार्ग आहे, जी मनाला एकाग्र, शुद्ध आणि सात्त्चिक बनवते. ती भक्ताला ईश्वराशी जोडते आणि भावनिक, मानसिक आधार देते. कर्मकांड, जप, ध्यान यांमुळे भक्त हळूहळू मूर्तीच्या पलीकडे जाऊन ईश्वराच्या निराकार, निर्गुण स्वरूपाला समजतो. सगुण पूजा ही एक पायरी आहे, ज्यामुळे भक्त आत्मचिंतन, आत्मस्थिती आणि शेवटी निर्गुण निराकारच्या परम स्वरुपामध्ये पोहचतो. ही प्रक्रिया म्हणजे स्थूलतेपासून सूक्ष्मतेकडे आणि मर्यादिततेपासून अमर्यादितेकडे अर्थात आत्म्याचा अनंततेचा प्रवास आहे.

अवतारलीला आत्मस्वरूपाची पारायण का?
आश्रमात सुरू असलेले अवतारलीला आत्मस्वरूपाची या ग्रंथाचे पारायण हा या अभ्यासाचाच एक भाग आहे. या ग्रंथाच्या निर्मितीमागील उद्देश सद्‌गुरुमाऊलींच्या अवतारामागील भूमिका, उद्देश स्पष्ट करणे तर आहेच, शिवाय त्यात आत्म्याची स्तुतीही आहे, ज्याद्वारे भाविकांना आत्मा काय आहे, याची कल्पना येते. या पारायणाचे पठण करणे म्हणजे सतत आत्मस्वरुपाचे नाम घेत त्याची स्तुती करणे आहे. आत्म्याच्या शक्तीला उत्सर्जित करण्याचे ते माध्यम आहे. प. पू. गुरुदेवांनी आपणासाठी ध्यानमार्ग प्रशस्त करून दिला, परंतु त्यांनी कधीही सगुणाची अवहेलना करण्यास सांगितले नाही.
चैतन्याशी द्वेष अचेतनी नास्तिकता।
मग भक्ती गरुडध्वजा कैसी पावे।
अनेक लोक सगुणाचीही पूजा करीत नाहीत, लोकांचा ही द्वेष करतात आणि निर्गुणाचेही ध्यान करीत नाहीत. निर्गुण ध्यानाच्या नावाखाली भगवंताच्या सगुण पूजेचाही अपमान करतात. काहीच न करता निर्भक्तीमय असण्यापेक्षा सगुण पूजनाच्या माध्यमातून आत्मभक्ती करीत स्वतःची अंतःचेतना विकसित करणे कधीही श्रेष्ठच आहे. आत्मस्वरुपाचे सत्त्व चित्तामध्ये प्रकट होण्यासाठी सगुणाच्या पूजेची आवश्यकता आहे. संसारी जीवांसाठी अथवा अज्ञानी साधकदशेतील जीवांसाठी हे नितांत गरजेचे आहे. त्यातूनच आपल्याला आत्मचिंतनाच्या अभ्यासाद्वारे आत्मस्वरूपाची पूर्ण ओळख होईल. आत्मा मालिक.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!