माजी मंत्री बबनराव ढाकणे सर्व सामान्यांचे प्रामाणिक नेतृत्व – आकाश नागरे
कोपरगाव प्रतिनिधी – बुलंद आवाजाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, मजूर वर्गाच्या हिताच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी सदैव सज्ज असे नेतृत्व माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे अशा भावना कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी आपल्या राजकीय संघर्षाचा प्रवास नेहमीच आपल्या मनोगतातुन सडेतोड मते कायमच मांडला आहे. तसेच वेगवेगळ्या कामकाजाच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न असो नाहीतर दुष्काळावरील प्रश्न असो तो मार्गी लावण्यासाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला व त्यासाठी कारावास देखील केला.
शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ आण्णा नागरे यांच्यासोबत ढाकणे साहेबांचे जिव्हाळ्याचे जुने ऋणानुबंध होते. चार वेळा आमदार, एकदा खासदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, विधानसभेचे उपाध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द गाजली. बबनराव ढाकणे यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्रातील दुष्काळा दौरा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाथर्डी तालुक्यात भेट दिली होती.
माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी केलेला संघर्ष हा राजकारणात व समाजकारणात येणाऱ्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अडचणीच्या काळात कोणाला त्यांची मदत मिळाली नाही असे कधीही झाले नाही. तसेच पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा आठवणीतील प्रवास आजही सर्वांच्या समोर आहे. प्रत्येक उपक्रमास आवर्जून हजर राहणारे बबनराव आण्णांची उणीव कायमच भासेल.
या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करत कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सभासद यांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.