१४ वी राष्ट्रीय सब ज्युनिअर चॉकबॉल क्रीडा स्पर्धा शिर्डीत होणार संपन्न
२१ मार्च ते २३ मार्च शिर्डीत देशभरातील नव खेळाडूंची हजेरी
शिर्डी प्रतिनिधी -दिनांक २१ मार्च ते २३ मार्च या कालावधीत १४ व्या राष्ट्रीय स्तरावरील सब ज्युनिअर चॉकबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन या वर्षी शिर्डी येथे संजीवनी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. सदर स्पर्धा या डॉ.एकनाथ गोंदकर क्रिकेट अकॅडमी मैदान शिर्डी येथे पार पडणार आहेत अशी माहिती संजीवनी शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकास विश्वस्त संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
विविध राज्यातून जवळपास ३२ संघ आणि त्यांचे प्रशिक्षक यासह मान्यवर आणि पंच यांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडणार आहे.मुले आणि मुली असे स्वतंत्र संघ देशातील कानाकोपऱ्यातून शिर्डीत दाखल झाले असून २१ मार्च रोजी सकाळी उद्घाटन होऊन या स्पर्धा सुरू होणार आहे.
नाविन्यपूर्ण खेळातून ग्रामीण भागातील खेळाडू घडला पाहिजे त्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. चॉकबॉल क्रीडा स्पर्धा हा खेळ दिवसेंदिवस लोकप्रीय होतो आहे आणि संघभावना वाढीसाठी या खेळाकडे पाहिले जाते.संजीवनी ग्रुपकडे यावेळी यजमानपद असून अतिशय चोख नियोजन या स्पर्धेचे झालेले आहे. चॉकबॉल असोशिएशनचे राष्ट्रीय पदाधिकारी व राज्यातील पदाधिकारी यांची देखील हजेरी यावेळी असणार आहे.
चॉकबॉल (Tchoukball) हा हाताने खेळला जाणारा वेगवान आणि क्रीडाशिस्तीला प्राधान्य देणारा खेळ आहे. तो मुख्यतः दोन संघांमध्ये खेळला जातो. जिथे खेळाडू चेंडूला हाताने फेकून, समोरच्या संघाच्या गोल पोस्टवरील प्रत्याघात फ्रेमवर मारतात. चेंडू परत जमिनीला स्पर्श करण्याआधी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी तो पकडला नाही तर गुण दिला जातो. हा खेळ स्वित्झर्लंडमधील डॉ. हरमन ब्रँड यांनी १९६० च्या दशकात तयार केला. चॉकबॉलमध्ये शारीरिक संपर्क टाळला जातो, त्यामुळे हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर मैत्रीपूर्ण आणि सुरक्षित खेळ म्हणून ओळखला जातो .या नाविन्यपूर्ण खेळाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा शिर्डी येथे आयोजित केल्याबद्दल क्रीडा प्रेमींनी आयोजक संजीवनी ग्रुप आणि रेणुकाताई कोल्हे यांचे कौतुक केले आहे. अधिकाधिक क्रीडा प्रेमी नागरिकांनी या स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचे मनोबल उंचावावे असे आवाहन देखील या निमित्ताने केले जाते आहे.