लेफ्टनंट संकेत सूर्यवंशी यांचा सत्कार
सैन्यात अधिकारी पदावर निवडीबद्दल आत्मा मालिक ध्यानपीठातर्फे गौरव
कोकमठाण : येथील आत्मा मालिक ध्यानपीठातील सेवक भगवान सूर्यवंशी यांचे पुत्र संकेत सूर्यवंशी यांनी खडतर परिस्थितीवर मात करीत भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली. या यशाबद्दल आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने प. पू. आत्मा मालिक माऊली यांच्या उपस्थितीत संत परमानंद महाराज, निजानंद महाराज आदींसह संत व विश्वस्तांच्या उपस्थितीत त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या मनोली येथील असलेले सूर्यवंशी कुटुंब सुमारे वीस वर्षांपासून आत्मा मालिक माऊलींच्या सेवेत आहे. त्यांचा पुत्र संकेत यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत (एसपीआय) दोन वर्षांच्या एनडीए प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून संख्याशास्त्र विषयात पदवी घेतली. शिक्षणाबरोबरच त्यांनी एनसीसीचेही प्रशिक्षण घेतले.

सन २०२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेत भारतीय हवाई दलातील पायलट पदासाठी त्यांची निवड होऊन त्यांनी संपूर्ण भारतात १५ वा क्रमांक मिळवला. पुढे २०२५ मध्ये भारतीय सैन्याच्या एनसीसी स्पेशल एंट्री परीक्षेत ५ वा क्रमांक मिळवत त्यांची निवड चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झाली आहे. लवकरच ते एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत मोठ्या कष्टाने यश मिळविल्याबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने आत्मा मालिक माऊलींच्या उपस्थितीत संकेत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संत परमानंद महाराज, निजानंद महाराज, साधनानंद महाराज, विवेकानंद महाराज, गायकवाड महाराज, बबन महाराज, प्रेमानंद महाराज, विजयानंद महाराज, दादा महाराज, जाधव महाराज, संत शांतिमाई, प्रभावती माई, स्मृतिमाई, ध्यानीमाई, स्वरूपामाई, सरस्वतीमाई, शिवानीमाई, तपस्विनीमाई, भगवतीमाई, यामिनीमाई यांच्यासह संस्थेचे विश्वस्त हनुमंतराव भोंगळे, बाळासाहेब गोरडे, प्रदीप भंडारी, प्रकाश गिरमे, केदार सारडा, ज्ञानदेव सांगळे, संकेत यांचे पालक मीरा व भगवान सूर्यवंशी आदी उपस्थित होते.