सहकार क्षेत्रात खळबळ ; तीस लाखांची लाच जिल्हा उपनिबंधकाना भोवली
नाशिक जिल्हा उपनिबंधक एसीबीच्या जाळ्यात
नाशिक प्रतिनिधी –
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा निर्णय बाजूने लावून देण्याच्या बदल्यात तीस लाख रूपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. सदर प्रकरणाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन सोमवारी रात्री सहकार खात्याचे नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७ वर्ष, रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईटस्, कॉलेज रोड, नाशिक व खाजगी इसम वकील शैलेश सुमतीलाल सभद्रा (वय ३२ वर्ष, रा. गंगापूर रोड नाशिक) यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत कारवाई चे कामकाज चालू होते. पदाचा गैरवापर करून जिल्हा उपनिबंधक यांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमवल्याची माहिती देखील समोर येताच चौकशीसाठी मोठे पथक रवाना झाल्याने अनेकांचा जीव भांड्यात अडकला गेला आहे.

नाशिक एसीबीने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने सापळा रचला होता.
सोमवारी संध्याकाळी झालेल्या या कारवाईमुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लाचखोरीची तब्बल तीस लाख रुपयांची भूक असलेला जिल्हा निबंधक खरे हा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात अडकला असल्याने या अधिकाऱ्यांवरील कारवाईमुळे सहकार विभागाचे इभ्रत चव्हाट्यावर आली आहे.