सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार – राजेंद्र झावरे
विकासाच्या नव्या दिशा दाखविण्याचा निर्धार
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणतं जाहीर होईल याकडे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागलेले होते. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण घोषणा जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी आपली तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा उभारण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे हे प्रगल्भ व सर्वसामान्यांच्या मनात स्थान मिळवलेले समाजसेवक राजेंद्र झावरे यांनीही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र झावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांमधून सक्रिय आहेत. नागरिकांशी सतत संपर्क ठेवत शहरातील प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
“कोपरगावचा विकास हेच माझं ध्येय आहे. नागरिकांच्या विश्वासाला पात्र राहून पारदर्शक, जबाबदार आणि उत्तरदायी प्रशासन देणे हे माझं प्राधान्य असेल,” असे झावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवीन प्रकल्प, तांत्रिक सुविधा आणि लोकसहभागावर आधारित आराखडा सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, राजेंद्र झावरे यांच्या इच्छुकतेमुळे आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. त्यांना समाजातील विविध घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तरुण वर्गातही त्यांचा चांगला प्रभाव दिसून येत आहे.
राजेंद्र झावरे हे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात उभारलेली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही केवळ स्मारक नाहीत, तर शहराच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर, शहरातील व्यापारी संकुल, नेहरू भाजी मार्केट, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी विकसित केलेली ठिकाणं, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी सेतु हे सर्व जनतेच्या दैनंदिन गरजांनुसार तयार करण्यात आले. त्यावेळी अनेक विकास कामे झाली आजही प्रत्येक कामे आठवणीत व डोळ्यासमोर आहे.
आगामी काही दिवसांत पक्षीय राजकारण आणि उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कोपरगाव नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत झावरे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. नागरिकांनी आता विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा ठेवली असून, राजेंद्र झावरे हे त्या अपेक्षांना उतरतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज कोपरगावची ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई देवी, सराफ बाजार येथील दक्षिणमुखी हनुमान आणि कुलदैवत श्री खंडोबा महाराज यांचे आशिर्वाद घेऊन व श्रीफळ अर्पण करून एक ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी केली आहे.