राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी – आकाश नागरे
शिर्डी लोकसभा आढावा बैठकीत कोपरगाव तालुका काँग्रेसची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव येथे नुकतेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षासाठी सकारात्मक वातावरण असुन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष वर्चस्व राहणार असुन आगामी लोकसभा निवडणुकीत अनुभवी, मतदारसंघात सर्वांचे परिचयाचे असलेले राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी आढावा बैठकीत वरिष्ठांकडे मागणी केली.
श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाने, सौ उत्कर्ष रूपवते, हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, अशोक कानडे, सोन्याबापू वाकचौरे मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याप्रसंगी कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाश नागरे बोलत होते.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते उच्चशिक्षित आहेत, त्यांना माजी मंत्री दादासाहेब रुपवते व मधुकरराव चौधरी यांचा मोठा वारसा असून त्यांनी यापूर्वी शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसची जबाबदारी देखील सक्षमपणे पार पाडली होती.
पुढे बोलताना आकाश नागरे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष असून सर्वसामान्यांचा विकास हीच पक्षाची विचारधारा आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे तालुक्यात कामकाज करतांना योग्य दिशा मिळत असुन निवडणुकीपर्यंत तालुक्यात मोठे संघटन तयार होणार असुन यात युवकांची मोठी संख्या राहणार आहे. तालुक्यात विकास बाजुला ठेवून विधानसभेच्या उमेदवारीवरून दोन दिग्गजांची सुरू असलेली रस्सीखेच काँग्रेस पक्षासाठी फायदेशीर ठरणार असुन काँग्रेस पक्षाची आपण कायम एकनिष्ठ असून पुढील काळात काँग्रेस पक्ष सक्षम पर्याय असणार असल्याचेही नागरे म्हणाले.