राजेंद्र लांडे यांनी भाऊसाहेब कचरे यांचा केला टप्प्यात आणून कार्यक्रम
परिवर्तन पॅनलने विरोधकांना शिक्षक क्रेडिट सोसायटीत तब्बल 21-0 ने चारली धूळ
कोपरगाव प्रतिनिधी – साडे नऊ हजार मतदार असलेली तगडी सोसायटी आणि जवळपास एक हजार कोटी ठेवी असणारी कुबेर संस्था समजली जाणारी अहमदनगर जिल्हा शिक्षक क्रेडिट सोसायटीची निवडणूक पार पडली. २५ वर्षापासून एकहाती डेरा टाकून बसलेल्या भाऊसाहेब कचरे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत अक्षरशः राजेंद्र लांडे यांच्या परिवर्तन पॅनलने त्यांचे पानिपत केले आहे.
२१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत यापूर्वीचा इतिहास पाहता तीन पॅनल काही अपक्ष असे उमेदवार उभे राहून कचरे यांना सत्ता मिळत होती.इतिहासात प्रथमच राजेंद्र लांडे यांनी या निवडणुकीत शिक्षक सभासद आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षक नेत्यांची मोट बांधली ज्यामुळे हा धमाकेदार विजय प्राप्त करणे शक्य झाले.प्रामुख्याने सुनील पंडित, दत्ता पाटील नारळे,आप्पा शिंदे यांच्यासह कचरे यांच्या सोबतचे संचालकांचे मन वळवून त्यांना परिवर्तन पॅनलचे भागीदार होण्यासाठी पुढाकार घेतला.
या ऐक्यामुळे माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, शिक्षक भारती संघटना, मुख्याध्यापक संघ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना,जुनी पेन्शन संघटना यांची एकत्रित मोट बांधण्याचे आव्हान लांडे, पंडित, नारळे ,शिंदे यांनी लीलया पेलले व जोडीला सत्ताधारी मंडळाचे विद्यमान संचालक येऊन मिळाल्यामुळे लाट प्रबळ निर्माण झाली..
शांत आणि संयमी स्वभावाचे राजेंद्र लांडे हे शिक्षक आणि शिक्षकेतर प्रश्नासाठी नेहमी लढत असतात. माजी खासदार स्व.दादा पाटील शेळके यांचे ते जावई असल्याने राजकीय संबंधांचा वापर खुबीने त्यांनी केला.या पूर्वी शिक्षक मतदारसंघात टी डी एफ संघटनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता.दुर्दैवाने विरोधी पॅनलचे भाऊसाहेब कचरे यांचा स्वभाव भरले ताट लोटण्याचा असल्याने त्यांनी लांडे यांच्या विरोधात बंडखोरी प्रचार केल्याने पाच जिल्ह्यात नगर जिल्हा एकत्र नाही असा संदेश गेला. शिक्षकांच्या मतदारसंघात कचरे यांनी पहिल्यांदा पैशाचा प्रयोग करून चुकीचा पायंडा पाडला ज्यामुळे राजेंद्र लांडे यांना पराभव वाट्याला आला. पराभव झाला मात्र त्यांनी शिक्षक संपर्क अभियान आणि काम सुरूच ठेवले.
2006 व 2018 ला शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवणाऱ्या कचरे यांनी 2024 ला झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे यांच्या सारखे तगडे उमेदवार जिल्ह्यातून असताना कचरे यांनी बौद्धिक दिवाळखोरी दाखवत पुन्हा जिल्ह्यात ऐक्य नाही असा संदेश दिला त्यामुळे कोल्हे यांनाही नुकसान सोसावे लागले.
कचरे यांनी अनेकदा आपले नशीब आजमावले पण सत्तेच्या हव्यासाचे परिणाम त्यांना भोगावे लागले असा सूर सर्वत्र उमटला.
भाऊसाहेब कचरे यांनी केलेल्या कारभारावर भ्रष्टाचाराचे डाग पडले.अनेक दस्तांमधून संस्थेच्या नुकसानीचे आणि मनमानी कारभाराचे नुकसान समोर आले. स्वतः निवृत्त असताना कचरे सत्तेसाठी ससेहोलपट करत होते तर दुसरीकडे राजेंद्र लांडे हे मी स्वतः कोणतेही पद घेणार नाही तर सभासदांची संस्था लक्ष ठेऊन जपेल असा विश्वास देत प्रचार करत होते.याचा परिणाम होऊन कचरे यांनी एकतर्फी केलेली निवडणूक लांडे यांनी परिवर्तन करून खेचून आणत भाऊसाहेबांना पुरते आसमान दाखवले..
या आधी झालेल्या निवडणुकीत काही जागा कचरे यांच्या विरोधात निवडून येत होत्या पण यंदा कचरे यांचा सुपडा साफ करून ही सोसायटी जिंकण्याची ताकद लांडे यांनी सिद्ध केली.
वारंवार सत्तेच्या लोभापायी इतरांच्या संधी कमी करण्याचे प्रयत्न करणाऱ्या भाऊसाहेब कचरे यांचा शांत आणि संयमी राजेंद्र लांडे यांनी टप्प्यात आणून कार्यक्रम केला अशीच चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.
आता या शेकडो कोटींची ठेव असणाऱ्या संस्थेचा कारभार पारदर्शक आणि स्वच्छ होण्यासाठी राजेंद्र लांडे कुणाच्या गळ्यात जबाबदारीची माळ टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.