भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये रोजगाराभिमुख कोर्सचे उद्घाटन
संगमनेर (प्रतिनिधी) – आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून रोजगाराच्या संधींना गवसणी घालण्यासाठी त्यांना व्यावहारिक व कौशल्याधारित शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. या उद्देशाने भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेमार्फत डी. टी. पी. (Typing Eng. 30) व आय. बी. पी. एस. (Banking Classes) हे नवे कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा शुभारंभ दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य एस. एम. खेमनर, उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे तसेच प्रा. बी. एस. कुटे, प्रा. एन. एस. गुंड, प्रा. जी. एल. गुंजाळ, प्रा. ए. के. दातीर, प्रा. एम. जे. भुसाळ, प्रा. एन. आर. जगताप, प्रा. जे. एम. रायते, प्रा. जे. आर. वाकचौरे, प्रा. पी. पी. वर्पे, प्रा. जी. सी. भवर, प्रा. व्ही. एम. गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नव्या उपक्रमाचे स्वागत केले.

प्राचार्य प्रा. खेमनर यांनी आपल्या मनोगतामध्ये या कोर्सेसचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञान व बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना संगणकावरील डी.टी.पी. व बँकिंग परीक्षांसाठीची तयारी यांचे संगठित प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्या करिअरला एक नवे वळण मिळेल.”
प्रा. एन. एस. गुंड व प्रा. जी. एल. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या कोर्समधून शैक्षणिक अभ्यासाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. ए. के. दातीर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एन. आर. जगताप व आभार प्रदर्शन प्रा. पी. पी. वर्पे यांनी केले.
या कोर्सेसमुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, बँकिंग सेवा व संगणकाधारित रोजगाराच्या संधींमध्ये अधिक सक्षम होण्यासाठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.