पैसे टाका; ऊसतोडणी करा! साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट ,नियंत्रण कोण ठेवणार ?
दादा सोनवणे- श्रीगोंदा प्रतिनिधी :- तालुक्यातील परिसरात सध्या उसाची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर पाच ते सात हजार रुपये मोजावे लागत आहेत. साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी कामगारांकडून होत असलेली शेतकऱ्यांची पिळवणूक कोण थांबविणार, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. ऊसतोडणी कामगार, ट्रॅक्टरचालक व कारखाना कर्मचारी हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असून, याकडे कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून यावर्षी ऊस तोडणी कामगारांची कमतरता असल्याचे निमित्त करून अनेक कारखान्यांचे कामगार शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी हजारो रुपयांची मागणी करत आहेत. परिसरात अनेक कारखान्यांकडून ऊस तोडणी सुरू आहे. मात्र, सर्व कारखान्यांच्या मजुरांकडून ऊस तोडण्यासाठी एकरी पाच ते सात हजार रुपये उकळले जात आहेत. अगदी प्रोग्रॅमप्रमाणे ऊस तोडणी येऊनही हजारो रुपयांच्या मागणीमुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे. ऊस तोडणी कामगार, ट्रॅक्टरचालक व कारखान्याचे कर्मचारी (स्लीपबॉय) यांची साखळी तयार झाल्याने सध्या परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पासून असा प्रकार घडत असल्याने पुढे मार्च-एप्रिलमध्ये यापेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्यानंतर एकरी दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम तोडणीसाठी मागितली जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. त्याबरोबर मागील वर्षीअनेक शेतकऱ्यांनी उसाचे फड पेटवून तोडणी करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच तसेच कारखान्यांकडून जाळलेल्या उसाची काही प्रमाणात कपात केली जाते. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, परिसरात अजूनही अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. पुढील काळात शेतीसाठी आवश्यक पाणी कमी पडणार असल्याने शेतकरी वर्गापुढे ऊस कारखान्याला लवकर कसा जाईल, हा प्रश्न पडला आहे.
सहकारी कारखाण्याकडून जास्त पिळवणूक ?
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सहकारी साखर कारखाने यांच्याकडून शेतकऱ्यांची जास्त पिळवणूक होत आहे त्यामुळे ५० एकर ऊस खाजगी कारखान्याला २ एकर सहकारी कारखान्याला कारण सहकार टिकला पाहिजे अशी खोचक टीका एका शेतकऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर माध्यम प्रतिनिधी यांना सांगितले